[संस्कृत] काँप्युटर फ्रेंडली आहे याचा अर्थ तीत फोर्ट्रान/पास्कल सारखे प्रोग्रामिंग करता येईल असा नसून, जर तिचे नियम व शब्द संगणकाला फीड केले तर संगणक ती भाषा उत्कृष्टरित्या वापरू शकेल.

इथे एक अत्यंत अर्थहीन चर्चा चालू आहे. जर तिचे नियम व शब्द संगणकाला फीड केले तर म्हणजे काय ? संस्कृतचेच नव्हे तर कोणत्याही भाषेचे  नियम व शब्द संगणकाला फीड केले तर या वाक्याला काहीही अर्थ नाही. संगणकाला भाषेचे नव्हे तर कोणतेही नियम फीड करता येत नाहीत, म्हणजे "सांगता" येत नाहीत. कारण संगणकाला काहीही "कळत" नाही. संगणक कसे काम करतो याच्या अगदी खोलात शिरल्यास अगदी मोजक्याच व सांकेतिक (क्रिप्टिक) आदेशांचा एक संच असतो. व कोणतेही काम या संचातील आदेशांची जुळणी करूनच करून घ्यावे लागते.  या संचाला रूढ अर्थाने "भाषा" म्हणणेच चुकिचे आहे. यात नाम/ सर्वनाम/ क्रियापद/ विशेषण/ . . . असले काहीही नसते. असतात ते फक्त काही आदेश.

या मंचावर हा  विषय या पेक्षा जास्त खोलात जाऊन समजावणे अशक्य आहे, पण एक उदाहरण देऊन समजावण्याचा प्रयत्न करतो. संस्कृत चे शब्द व नियम तुमच्या चारचाकी गाडीला फीड केले तर ती गाडी अधिक उत्कृष्टरित्या चालू शकेल या विधानाला काही अर्थ आहे? गाडीला आपण काही "आदेश" देतो, स्टीयरिंग फिरवून, गियर चा दांडा हलवून, ब्रेक दाबून, इत्यादी. व गाडी त्या आदेशांचे पालन करते. ब्रेक दाबला कि एक घरषण पॅड ब्रेकड्रम वर दाबले जाते, वगैरे. गाडीला कोणतीही भाषा "कळत" नाही, किंवा कोणत्याही भाषेचे शब्द व नियम गाडी ला "फीड" करता येत नाहीत. संगणक या पेक्षा फार वेगळा नाही.

प्रत्यक्षात संस्कृत अतिशय व्याकरणशुद्ध भाषा आहे व त्यात शब्दांची कशीही जुळणी केली तरी अर्थ बदलत नाही ही निर्विवाद सत्य गोष्ट आहे‍. हे पण एक चुकिचे विधान. नैनं  छिंदंती शस्त्राणी नैनं दहती पावकः याचा अर्थ सर्वांना माहीत आहे. शस्त्र त्याला भेदू शकत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही. ही शब्दांची जुळणी बदलून नैनं दहती शस्त्राणी नैनं छिंदंती पावकः अशी केली तरी अर्थ तोच राहतो ? उगाच आपले कै च्या कै.  त्या पुढे, जरी एकादी भाषा अशी असली कि ज्यात शब्दांची कशीही जुळणी केली तरी अर्थ बदलत नाही  तर तो काही गुण नव्हे. संगणकाच्या आदेश संचात शब्दांची कशीही जुळणी केली तरी अर्थ बदलत नाही  हे अजिबात चालणार नाही. MOV AX, DS या आदेशाचा अर्थ आहे DS या रजिस्टर (फक्त एक संख्या स्टोर करू शकणारे मेमरी यूनिट) मध्ये जी काही संख्या आहे ती AX या रजिस्टर मध्ये कॉपी करणे. कुठल्या मेमरीतील संख्या कुठल्या मेमरीत कॉपी करायची,  DS मधील संख्या AX मध्ये का AX मधील संख्या DS मध्ये हे नक्की पाहिजे. शब्दांची जुळणी बदलली तर अर्थ बदललाच पाहिजे. तोच राहून कसे चालेल?  [ "सचिनला भारत रत्न द्या, हरभजनला टीम मधून बाहेर काढा" आणि "हरभजनला भारत रत्न द्या, सचिनला टीम मधून बाहेर काढा" या दोन्हीचा अर्थ एकच असणारी भाषा असेल, तर ती भाषा चांगली का टाकाऊ ?

संस्कृतच नव्हे तर इतर कोणतीही भाषा संगणका करता योग्य ही नाही किंवा अयोग्य ही नाही. "भाषा" या शबदातून आपल्याला जो काही अर्थ उमजतो, त्या अर्थाने भाषेचा व संगणकाचा काहीही संबंध नाही.