लोकसत्तामधील अग्रलेखातील मते अगदी योग्य आहेत. याच संदर्भात लोकसत्तानेच व्यक्त केलेल्या विचारात असेही बऱ्याच वेळा व्यक्त केलेले दिसते की भ्रष्टाचार थोड्याफार प्रमाणात आपण स्वतः केलेला आपल्याला चालतो. म्हणजे शक्य झाले तर सिग्नल तोडून पुढे जाण्याचा  प्रयत्न आपल्यापैकी ९०% लोक करतात इतकेच नव्हे एकादा प्रामाणिकपणे सिग्नल हिरवा होण्याची वाट पाहू लागला तर ते ९०% लोक त्याला शिव्या घालायला लागतात. मनोगतवर मीच मागे लिहिलेल्या "घर राहावे बांधून"या लेखांकात एके ठिकाणी मिळकत दाखला प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शहर मापन कचेरीतील कारकुनाने मला मागितलेले चारशे रु. मी न भरल्याबद्दल माझ्या भ्रष्टाचार न आवडणाऱ्या मित्रांनीच मला कसे वेड्यात काढले याचा उल्लेख मी केला आहे‌‌. सरळ मार्गाने होणारी एकादी गोष्ट जरा विलंब लागतो म्हटले की लगेच थोडेफार  पैसे देऊन लौकर झाली तर बरी असे आपल्याला वाटते.   शिवाजी नेहमी शेजाऱ्याच्या घरात जन्मावा   असे आपल्यापैकी बहुतेकांना वाटते.या संदर्भात राजकारणात पडणाऱ्यांनी अगदी घरादारावर तुळशी पत्र ठेऊन जनतेची सेवा करावी असे आपल्याला वाटते त्याचे एक कारण  स्वातंत्र्यापूर्वी  टिळक, आगरकर, सावरकर , फुले, आंबेडकर यांनी  काही आदर्श आपल्यासमोर ठेवले पण त्यांचे अनेक अनुयायीही तसेच होते हे मात्र आपण सोयिस्करपणे विसरतो.
      यासंदर्भात अमेरिकेचा पहिला अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन याचे उदाहरण पाहण्यासारखे अमेरिकेच्या पहिल्या काँग्रेसने  प्रत्यक्ष त्या पदाचे  वेतन भरघोस म्हणजे  वर्षाला २५०००  डॉलर्स  इतके  ठरवले.अध्यक्षाचे वेतन ठरवताना वॉशिंग्टन  स्वतः अतिशय  संपन्न असल्यामुळे त्याने वेतन न घेताच काम करण्याची तयारी दाखवली तरी हे वेतन असावे असे त्याने मान्य केले . त्यामागे असा उद्देश होता की त्या पदावर नेहमीच संपन्न व्यक्तीने येऊन विनावेतन काम करावे अशी अपेक्षा जनतेने ठेवायला नको किंवा ही पदे संपन्न व्यक्तींची मिरासदारी व्हायला नको. पण आपण मात्र तशी अपेक्षा ठेवतो व  राजकारण हा बदमाशांचा शेवटचा मुक्काम आहे या विधानाची सत्यता प्रत्यक्षात येण्यास  बऱ्याच अंशी कारणीभूत ठरतो.
      तो दूरदर्शीपणा आपल्या सुरवातीच्या स्वार्थत्यागाने भारलेल्या राज्यकर्त्यांनी मात्र न दाखवल्यामुळे आजही १०० कोटी किंवा त्याहूनही जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशाचा कारभार करणाऱ्या पंतप्रधानापासून साध्या मंत्र्यापर्यंतच्या व्यक्तींना मिळणारा पगार हा जगातील कोणत्याही देशाच्या त्याच अधिकारावर काम करणाऱ्या व्यक्तीपेक्षा अतिशय कमी आहे.पं.नेहरूना स्वत:ला पैशांची जरुरी नसली तरी पुढे त्यांच्या सारख्याच सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणाऱ्या व्यक्तीच राजकारणात पडतील असे त्यानी गृहीत धरायचे कारण नव्हते.लालबहादुर शास्रींनी राजकारणात हयात घालवून आणि पंतप्रधानपद भूषवून मरणोत्तर त्यांच्या कुटुंबीयांना रहाते घरही नव्हते.असे स्वार्थत्यागी लोकच राजकारणात पडतील अशी अपेक्षा करणेही योग्य नव्हते.   राजकारण्यांच्या भ्रष्टाचारास उत्तेजन देणारी ही परिस्थिती निर्माण होण्यास हा त्यांचा अदूरदर्शीपणा कारण झाला.असे मत लालबहादुर शास्त्री पंतप्रधान असताना त्यांचे सचिव म्हणून काम केलेल्या आणि त्यांच्याइतकीच स्वच्छ कारभाराबद्दल ख्याती असणाऱ्या सी.पी. श्रीवास्तव या सेवाबिवृत्त सनदी अधिकाऱ्याने लिहिलेल्या "Corruption India's enemy within"या पुस्तकात मांडले आहे. एकेकाळी केलेल्या चुकीचा वचपाच जणु राजकारणी मंडळी कल्पनाही करता न येणारे घोटाळे करून काढत आहेत.