अ) @सुनील.  १) आणि ३) शी सहमत.  मेकॉलेबाबत मात्र त्याच्या 'दुष्ट' हेतूंविषयीच मराठीमध्ये जास्त वाचले आहे. दि.२६/१/२०१४ च्या लोकसतामध्ये 'मेकॉले, काल आणि आज' या पुस्तकाचे परीक्षण आले होते.  त्यात " मेकॉलेच्या मनात 'पाप' होते, त्याला हा देश घडवायचा नव्हता तर  मोडायचा होता" हा  हिंदुस्तानात पक्का रुजलेला समज कसा खोटा आहे ते दाखवले आहे. म्हणजे मेकॉलेने  भारतीय संस्कृतीची 'भलावण' केली, असा आपल्या लोकांचा समज नाही किंवा नव्हता, पण प्रत्यक्षात त्याने ती केली होती !
ब) बाकी संस्कृत भाषेला पवित्र समजणे, तिचा नको तेव्हढा उदो उदो करणे हे मलाही पटत नाही. यात 'अजेंड्या'चा वास येतो खरा.
भारतीय भाषांपैकी द्रवीड भाषांची संस्कृत ही जननी नाही. अतिपूर्वभारतातील तुरळक प्रमाणात बोलल्या जाणाऱ्या आदिवासी भाषा या संस्कृतोद्भव नाहीत.
क) जुनी पर्शिअन, जुनी ग्रीक याप्रमाणे जुनी (ऋग्वेदिक) संस्कृत ही  मृत भाषा आहे. आणि संस्कृतपासून वेगळी आहे. जशी मराठी ही संस्कृतापासून निघाली असे मानले तरी ती वेगळी भाषा आहे, तशी.   ही संस्कृत ही सुद्धा पर्शिअनची मावसबहीण आहे, आणि बरेच बदल होत होत ऋग्वेदिक संस्कृताच्या रूपाला पोचली आहे.  पर्शिअनचा प्रभाव संस्कृतपेक्षा मोठ्या भूभागावर होता.
ड) काही विद्वानांच्या मते तर सध्या अस्तित्वात असलेल्या संस्कृताच्या रूपरचनेवर प्राकृताचाच फार मोठा प्रभाव आहे‌.  म्हणजे प्राकृत ही सहजभाषा आणि संस्कृत हे तिचे रीफाइंड रूप. गाहा सत्तसई हा माहाराष्ट्री प्राकृतातला काव्यसंग्रह सुमारे ख्रिस्तपूर्व २०० या काळातला.म्हणजे कालिदासाच्या आधीचा काळ. या गाथा सामान्य नागरिकांकडून गोळा केलेल्या. म्हणजे त्याआधी किमान दोनशेतीनशे वर्षे तरी ही भाषा बहुजनांमध्ये प्रचारात होती. भारतातल्या बहुतेक सर्व जुन्या कोरीव लेखांमध्ये प्राकृतच प्रकर्षाने वापरली आहे. ख्रि. पू.६०० मधल्या महावीर आणि बुद्धाची प्रवचने, तत्त्वे प्राकृतातच आहेत कारण प्राकृत  ही अभिजातसंस्कृतपूर्व काळापासून वेदिक संस्कृताच्या बरोबरीने (साइड बाय साइड )बोलली जाणारी 'ओबडधोबड' लोकांची भाषा होती, जिची मुळे कदाचित तांड्यांच्या (ट्राय्बल) जुन्या भाषांत होती.
ई) पाणिनीने जर आपली अष्टाध्यायी लिहून ठेवलीच असेल तर ती खरोष्टी किंवा अरेमाइक लिप्यांत असावी कारण तोपर्यंत देवनागरी लिपी विकसित झाली नव्हती. देवनागरी लिपी ही संस्कृतची लिपी म्हणून ती श्रेष्ठ, असाही गैरसमज काही जणांचा असतो, म्हणून हे छोटेसे अवांतर केले.
म्हणून संस्कृतला सरसकट भारतीय भाषांची जननी मानणे तर्कसुसंगत नाही.