संस्कृत ही भारतीय भाषांची जननी आहे हे विधान तितकेसे तर्कसुसंगत नाही. द्रवीडी भाषा संस्कृतोद्भव नाहीत. अतिपूर्व भारतातल्या प्रमुख आदिवासी भाषा याही संस्कृतोद्भव नाहीत‌. सध्या ग्रंथसाहित्यरूपात अस्तित्वात असलेली अभिजात संस्कृत (आर्ष शब्द तितकासा समर्पक वाटत नाही. ) ही ऋग्वेदिक संस्कृतहून वेगळी भाषा आहे. अवेस्तन पर्शिअन, जुनी पर्शिअन आणि सध्याची पर्शिअन यात 'पर्शिअन' हा शब्द समान आणि कायम असला तरी या भाषा वेगळ्या मानल्या जातात. ग्रीक आणि संस्कृत भाषांचेही तसेच आहे. ऋग्वेदीय संस्कृत ही तर मृत भाषा आहेच पण अभिजात संस्कृतही मृतप्राय आहे. आणी ती न बोलल्यामुळे आजच्या भारतातल्या कोणाचेच फारसे काही बिघडलेले नाही. 'इंडॉलॉजी' किंवा तत्सम शास्त्रे शिकणाऱ्यांसाठी ती आवश्यक आहे पण तेव्हढ्या लोकांसाठी संस्कृतशिक्षणाच्या सोयी उपलब्ध आहेत. ऋग्वेदिक संस्कृत ही सुद्धा मूळ भाषा नाही. कुठल्यातरी 'प्रोटो' भाषेपासून उत्क्रान्त होत होत तिला ऋग्वेदिक फॉर्म मिळाला आहे.अवेस्तन पर्शिअन आणि रुग्वेदिक संस्कृत या मावसबहिणी शोभाव्यात इतके साम्य त्यांच्यात आहे. पर्शिअनचा प्रभाव मोठ्या भूभागावर होता. पर्शिअन साहित्य आणि संस्कृती अतिशय समृद्ध आहे. त्यामुळे संस्कृतलाच वेगळी, विशेष आणि पवित्र मानायचे कारण नाही. मराठी आणि तत्समान भाषा या संस्कृतमधून थेट उगम पावलेल्या नाहीत. 'गाहा सत्तसई' हा माहाराष्ट्री प्राकृतमधला काव्य संग्रह इ‌अ. २०० ते इ. पू. २०० या कालावधीत कधी तरी संकलित झाला असावा असे मानले जाते. या गाथा किंवा गीते ही लोकांकडून मागवून घेऊन संकलित केल्या आहेत. म्हणजे तत्पूर्वी किमान दोनशे ते तीनशे वर्षे ही भाषा लोकसमूहांची रोजव्यवहाराची भाषा होती. हा काळ कालिदासाच्याही मागे जातो. जुन्या संस्कृत नाटकांत सर्वसामान्य माणसे आणि स्त्रिया प्राकृतात बोलतात. जनसामान्यांची प्राकृत हीच 'प्राकृतिक '(नैसर्गिक) भाषा होती, संस्कृत नव्हे. इ‌‌.स.पूर्व  सहाव्या शतकात महावीर आणि बुद्धाने आपली प्रवचने आणि उपदेश यांसाठी प्राकृतच वापरली कारण त्यांना बहुसंख्य अश्या आम जनतेशी संवाद साधायचा होता. .  संवाद . गुप्तकाळापर्यंतचे बहुतेक शिलालेख प्राकृतात आहेत. पाणिनीने हे सर्व लक्ष्यात घेऊनच अभिजात संस्कृतची बांधणी केली असावी. (पाणिनीचा काळ इ‌‌‌.स. पू. सहावे शतक इतकाच मागे खेचता येतो. म्हणजे पाणिनीपूर्वकाळात (उतरणीला लागलेल्या) ऋग्वेदिक संस्कृताच्या बरोबर प्राकृत भाषा मोठ्या प्रमाणात लोकसमूहांकडून बोलल्या जात होत्या.  थे पाणिनीचा उल्लेख झालाच आहे तर आणखी एक गोष्तष्ट लक्षात घेणे रोचक ठरेल. पाणिनीने आपली अष्टाध्यायी जर कुठे लिहून ठेवली होती असेल तर ती बहुधा खरोष्ठी अथवा अरेमाइक लिपीत असावी.