खरे तर हा शब्द लिहिताना मलाही अडखळायला झाले होते. ऋग्वेदीय हा शब्द अधिक योग्य वाटत होता. वैदिक म्हणजे वेद पढलेला (ब्राह्मण). त्यामुळे वैदिक शब्द बाद झाला. विकीवर सर्वत्र वेदिक हा शब्द वापरला जातो जो इक् या आंग्ल प्रत्ययानुसार बनवला असावा. त्याचा अर्थ चारही वेदांसंबंधी/विषयी/मधील असा होतो. येथे फक्त ऋग्वेदासंबंधी (ऋग्वेदाच्या भाषेसंबंधी ) लिहायचे होते म्हणून विकीवर रुळलेल्या वेदिक ऐवजी ऋग्वेदिक शब्द वापरला. पण तो चुकीचा आहे असे वाटते. भारत- भारतीय, वृत्त-वृत्तीय या प्रमाणे ऋग्वेद-ऋग्वेदीय. आणखी म्हणजे 'इक' लावताना बदल होत असावेत. समर-सामरिक, ग्रंथ-ग्रांथिक, जीव-जैविक, सर्वत्र-सार्वत्रिक, पण स्वर्ग-स्वर्गीय, केंद्र-केंद्रीय, वर्ग-वर्गीय, वित्त-वित्तीय वगैरे.
आत्ता संदर्भ हाताशी नाहीत. एकदोन दिवसांत योग्य नियम पडताळून इथे लिहीन. तोपर्यंत इथे कुणी खुलासा केल्यास उत्तमच होईल.
हा गोंधळ (कन्फ्यूजन) तत्परतेने लक्ष्यात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.