'वेदिक' शब्द जरी इंग्लिशमध्ये वापरला जात असला तरी मराठीमध्येही, निदान वृत्तपत्रीय भाषेत तरी चांगलाच रुळला आहे. 'वेदिक गणित' ही संज्ञा तर सररास वापरली जाते. त्यामुळेच प्रतिसाद लिहिताना तो शब्द पटकन डोळ्यांसमोर आला. सध्याची मराठी, संस्कृतचे व्याकरणनियम सैलसरपणेच वापरते. सुशोभीकरण, राष्ट्रीकरण, सरसकटीकरण, सपाटीकरण,डांबरीकरण,वगैरे शब्द रूढ झाले आहेत. ऋग्वेदिक हा शब्द पटकन सुचला म्हणून लिहिला हे तर प्रतिसादात मान्यच केले आहे. नवीन शब्द रूढ झाले तर भाषेचा तोटा होत नाही, झालाच तर फायदाच होतो. एक शब्द अस्तित्वात आहे तर त्यासारखा दुसरा कशासाठी, असे मानण्याचे कारण नाही. नाही तर विहीर, वाव, बाव, बावडी असे समानार्थी शब्द रूढ झालेच नसते. बरेच इंगिश शब्द रूढ होत आहेत, होऊं देत की. सामान्य जनता त्या शब्दांचे आपल्याला सोपे वाटेल ते रूप बनवून ते वापरीत राहील. यामुळे भाषा भ्रष्ट होते असे नाही. उलट ती लवचीक होते. संस्कृतच्या नियमांनुसार 'ऋग्वेदिक' शब्द चुकीचा आहे हे मान्यच. पण प्रतिसाद मराठीत आहे म्हणून कदाचित चालून जावे.
जोडणी : मराठीमध्ये शब्दाला विभक्तिप्रत्यय लावताना शब्दात थोडासा बदल होतो हा नियम आहे. उदा. रामाने, सीतेला, अश्वत्थाम्याने, नचिकेत्याला वगैरे. पण आजकाल मराठीचा कल , विशेषतः विशेषनामांच्या बाबतीत, हे बदल न करण्याचा आहे. अळूचे (अळवाचे नव्हे) फतफते, लिंबूचे(लिंबवांचे नव्हे) लोणचे. सासूचा (सासवेचा नव्हे)अपमान, वसंतला (वसंताला नव्हे) तनुजाचा (तनुजेचा नव्हे) चित्रपट वगैरे. हे बदल इतके नकळत झाले आहेत की आपल्या ते लक्ष्यातही आले नाहीत.
असो. प्रतिसाद विषयाला धरून नसले तरी माहितीपूर्ण असतील तर वाचायला मजा येते. विषयांतर होत आहे याचे दुःख वाटत नाही. तसेही मूळ विषयावर ज्यांना प्रतिसाद द्यायचे होते त्यांचे देऊन झाले आहेत. चर्चा थांबल्यातच जमा होती. या निमित्ताने मूळ विषय चर्चेत रहात असेल तर चांगलेच आहे.