मराठीच्या तुलनेत संस्कृतचे नियम जास्त कठोर (स्ट्रिक्ट) आहेत का ? किंवा मराठी चे नियम जास्त लवचिक आहेत का? अजिबात नाही. हे का व कसे, हे संगण्या करता एक लेख नाही तरी लेखुकला लिहावा लागेल.
लिहायची-बोलायची कोणतीही भाषा ठरवून बनविलेली नसते. विरुद्ध उदाहरण म्हणजे संगणकाच्या "भाषा", ज्या ठरवून बनविलेल्या असतात.
१९६८ पर्यंत संगणक प्रोग्रमिंग करता ज्या भाषा होत्या त्या समाधानकारक नव्हत्या. म्हणून १९६८ मध्ये निकलाउस विर्थ या शास्त्रज्ञाने एक नवीन भाषा बनविण्याचे ठरविले. त्या नवीन भाषेत काय असावे व काय नसले तरी चालेल; काय शक्य आहे व काय अशक्य; इत्यादी ठरविले, व मग दोन वर्षे संशोधन करून नवीन भाषेचे शब्द संग्रह व नियम ठरविले, त्या भाषेला पास्कल हे नांव दिले, व अश्या प्रकारे १९७० साली पास्कल या भाषेचा जन्म झाला.
in contrast to this, अमूक एका वर्षा पर्यंत ज्या भाषा होत्या त्या समाधानकारक नव्हत्या. म्हणून अमूक साली अमूक भाषातज्ञाने एक नवीन भाषा बनविण्याचे ठरविले. त्या नवीन भाषेत काय असावे व
काय नसले तरी चालेल; काय शक्य आहे व काय अशक्य; इत्यादी ठरविले, नवीन भाषेचे शब्द संग्रह व नियम ठरविले, त्या भाषेला
संस्कृत (किंवा मराठी, तामिल, फ्रेंच, स्वाहिली इत्यादी) हे नांव दिले, व अश्या प्रकारे अमूक साली संस्कृत (किंवा मराठी, तामिल, फ्रेंच, स्वाहिली इत्यादी) या भाषेचा जन्म झाला - असे नाही. सर्व भाषा आपसूकच विकसित होत गेल्या.
आज आपण जे शब्द किंवा जे नियम संस्कृत मध्ये "आहेत" असे म्हणतो, ते "सुरवाती पासून" संस्कृत मध्ये नव्हते, कारण संस्कृत ठरवून बनविलेली नसल्याने तिला "सुरवात" अशी नव्हतीच. कोणतीही भाषा वापरताना बदलत जाते. या प्रक्रियेला काही लोक भाषा "विकसित" होणे म्हणतात तर काही लोक त्याच प्रक्रियेला भाषा "भ्रष्ट" होणे असे म्हणतात. प्रक्रिया तीच, द्रुष्टीकोन वेगळा.
पण विकसित होण्या करता भाषा वापरात असावी लागते. सिग्नल (रेल्वेचा) याला मराठीत सिग्नल असेच म्हणतात. वेगळा शब्द नाही. संस्कृत मध्ये सिग्नल करता "लोहपथ अग्नीरथ गमनागमन आदेश दर्शक पट्टीका" हे शाळकरी पोरांचा विनोद म्हणून ठीक आहे, पण आज संस्कृत वापरात असती तर सिग्नल करता आपण हा "शब्द" वापरला असता ? मला नाही वाटत. मला वाटते संस्कृत ने सिग्नल हा शब्द समावून घेतला असता. जसा मराठी ने सिग्नल, टेबल, आईस्क्रीम, इत्यादी समावून घेतले, व इंग्रजीने "योग" ला किंचित बदलून योगा, घी, कबाब, इत्यादी समावून घेतले. लॅटीन ने "योगा" समावून घेतला नाही कारण योगविद्या त्या लोकां कडे पोहोचली तेव्हां ती भाषा वापरातच नव्हती.
कल्पना करा कि एका टीव्ही वाहिनीवर (माझ्या मराठीत दूरचित्रवाणी हा शब्द नाही, टीव्ही हाच शब्द आहे) दोन मालिका सुरू आहेत, संस्कृत, व मराठी. जसजशी मालिका पुढे सरकते, त्यातील पात्रांच्यात बदल घडतात. कोणाला अपत्य होते व एक नवीन पात्र जन्माला येते, तर कोणाचा मृत्यू होतो व एक पात्र मालिकेच्या बाहेर जाते; लग्ने, घटस्फोट इत्यादी होत असतात; पात्रांचे केस पांढरे होऊ लागतात, वगैरे.
कालांतराने संस्कृत ही मालिका बंद पडते व मराठी ही मालिका सुरुच राहते. अर्थातच संस्कृत ही मालिका जेव्हां बंद पडते तेव्हां त्यातील पात्रे जशी असतात तशीच तिथेच "स्थिर" होतात, गोठतात. मराठी ही मालिका सुरुच असल्याने त्यातील पात्रांचे कालानुरूप बदल होतच राहतात. एका पात्राला टक्कल पडते. आपण असे म्हणू शकतो का कि मराठीतल्या पात्रांना टक्कल पडू शकते, पण संस्कृतच्या नियमानुसार पात्रांना टक्कल पडत नाही ? आज आपण जी संस्कृत "वाचतो" ती "गोठलेली" संस्कृत आहे. जर ती जिवंत असती तर तीत 'ऋग्वेदिक' येवढच नव्हे तर सिग्नल, टेबल, आईस्क्रीम, हे सर्व शब्द असते.