काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारचा एक विषय फेसबुकवरील अभिव्यक्ती या ग्रुपमध्ये चर्चिला गेला होता. पाळणाघर आणि वृद्धाश्रम आता आवश्यकच झाले आहेत आणि त्यापासून कोणाचीही सुटका नाही, असा एकंदरित चर्चेचा सूर होता. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात तसेच कुटुंब तितक्या प्रवृत्ती असतात. अभिव्यक्तीवरील विजय तरवाडे यांचे मत खाली देत आहे.........
"पाळणाघर आणि वृद्धाश्रम 

या दोन्ही संकल्पना आता स्वीकारायला हव्यात.आमच्या घरी आम्ही वीस वर्षे पाळणा घर चालवले होते. सगळी मुले आता मोठी व सुजाण झाली आहेत. एकाही बालकाच्या मनात आईबापांविषयी अढी राहत नाही. सुरुवातीला लहान मूल दवाखान्यात लस टोचताना रडते. शाळेत जाताना रडते. अंघोळ घालताना रडते. तसेच पाळणाघरात रडते. पण तिथे समवयस्क मित्र-मैत्रिणींच्या सहवासात त्याचा विशेष विकास होतो. चारचौघात वावरण्याचे त्याला बाळकडू मिळते. उगीच तक्रार करण्यात अर्थ नाही.

वृध्दाश्रम देखील आता अटळ होणार आहेत. जे लहान मुलांना समजते ते आता आपण वृद्धांनी देखील समजून घेतले पाहिजे" 

त्यानंतर प्रतिक्रिया आल्या. खूप आल्या. लहान घरे, नोकरी, व्यवसाय, महागाई, आणि अशा अनेक गोष्टींमुळे कुटुंबे विभक्त होत चालली आहेत. नवरा बायको नोकरी करणारी असतील तर घरी वृद्ध आईवडीलांचा सांभाळ कोण करणार, त्यापेक्षा वृद्धाश्रमात काळजी घेतली जाते. परदेशात जाणारे तरुण आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करतातच असे नाही, जे करतात त्यांचेवर संस्कारच कमी पडले असे समजावे. एकंदरीत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे......अर्चनाताई......... सापेक्ष........... आजूबाजूची परिस्थिती, गुणसूत्रे, संस्कार, स्वार्थ, परिस्थितीचे आकलन करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी कुवत यावर सगळं अवलंबून आहे. अधिक खोलात जावू नका. कहीही हाती लागणार नाही.

अतुल सोनक