ह्या चर्चेच्या अनुषंगाने बा. भ. बोरकरांची ही कविता आठवली. सर्वांनाच आणि सर्व परिस्थितींत असे वागणे शक्य होईल असे नाही पण प्रयत्न करायला काय हरकत आहे?
कांचनसंध्या
पिलांस फुटुनी पंख तयांची घरटीं झाली कुठे कुठे,
आता अपुली कांचनसंध्या मेघडंबरी सोनपुटें.
कशास नसत्या चिंता-खंती वेचू पळती सौम्य उन्हे,
तिमिर दाटता बनुनि चांदणे तीच उमलतील संथपणे.
सले कालची विसरुनी सगळी भले जमेचे जिवीं स्मरू,
शिशुहृदयाने पुन्हा एकदा या जगतावर प्रेम करू.
उभ्या जगाचे अश्रू पुसाया जरी आपुले हात उणे,
तरी समुद्रायणीप्रमाणे पोसूं तटिंची म्लान तृणे.
इथेच अपुली तीर्थ-त्रिस्थळी वाहे अपुल्या मुळी-तळी,
असूं तिथे सखि! ओला वट मी आणिक तूं तर देव-तळी.
शिणुनी येती गुरे-पाखरे तीच लेकरे जाण सखे,
दिवस जरेचे आले जरि त्यां काठ जरीचा लावू सुखे.
------------------------------