अर्चनाताई, तुम्ही विषय चांगला काढलात. बऱ्याचजणांकडे यावर बोलायला खूप काही असेल. तुमच्या यजमानांनी विदेश नाकारला याचा आनंद आहे पण उद्या तुमचा मुलगा हेच करेल अशी खात्री आहे का तुम्हाला? कारण शिक्षणासाठी आजकाल अमेरिकेत जाण्याची फॅशन आहे. एकदा तिकडे गेलेली मुलं सहसा परत येत नाहीत असं बघण्यात आलं आहे. अगदी दोनच वर्षांसाठी गेलेले तिकडेच स्थायिक होतात हे बघितलं आहे. म्हणजे कंपनीच्या कामासाठी जाणारे तिकडे गेले की नोकरी बदलून तिकडेच राहणं पसंत करतात. याच्या कारणांचा खरंच शोध घ्यायला हवा. 

मला वाटतं की कदाचित याला एक कारण असं असेल की एकदा तिकडे गेल्यावर तिकडच्या सुखसोयी अनुभवल्यावर परत इकडे यायला मन तयार होत नाही. उदा. तिकडे लाईट जात नाहीत असं ऐकून आहे. आपल्याकडे तर लाईट जाण्याचं प्रमाण अतिरेकी आहे. यासारखीच आणखीही काही कारणं असतील. 

दुसरं म्हणजे आजकाल मुलींना राजा-राणीचा संसार हवा असतो. सासू-सासरे, दीर, नणंदा हा गोतावळा नको असतो. मुलगी (किंवा मुलगा) बघण्याच्या कार्यक्रमातच 'आई वडील कुठे राहणार? ' हा प्रश्न सर्रास विचारला जाताना मी बघितलं आहे. आजकाल स्त्रियांच्या बाजूने कायदे झाल्यामुळे नेमका ' सासुरवास' कशाला म्हणतात हेच मुलींना कळत नाही. त्यामुळे सासू जराही काही बोलली की लगेच मुलीचे आई-वडील तिच्या संसारात दखल देतात. मला वाटतं हे चुकीचं आहे. आईने मुलीच्या संसारात फार डोकावू नये. तिला अगदी मारझोड किंवा फारच हॅरॅस केलं जातंय तर आई वडिलांनी गप्प बसूच नये. पण आपल्या मुलीला पण जमवून घ्यायची सवय लावायला हवीच. आपल्याकडे लग्न हा एक संस्कार आहे , करार नाही. 

  या सगळ्या मुळे मला वाटतं की मुलींना परदेशी जाऊन रहायला आवडतं. आपोआपच सगळ्या जबाबदाऱ्या टळतात आणि वाईटपणा पण येत नाही. वास्तविक उतारवयात आई वडिलांना मुलांचा पैसा नको असतो तर मुलं, नातवंडं जवळ असावी, आपल्या शेवटच्या दिवसात त्यांच्या सहवासात जास्तीतजास्त राहता यावं हीच इच्छा असते. रात्री बेरात्री तब्येत बिघडली तर शेजाऱ्यांकडे धाव घेण्यापेक्षा मुलं जवळ असलेली बरीच नाहीत का? त्यामुळे मुलं कुठेही असली तरी आई वडील ही त्यांचीच जबाबदारी असते. नव्हे, असायलाच हवी. 

ज्यांनी तुम्हाला जन्म दिलाय ते तुम्हाला जन्माला पुरत नाहीत. त्यामुळे त्यांच्या माघारी तुमचे तुम्हीच जगणार असता, मजा करणार असता. उद्या तुम्ही म्हातारे व्हाल तेव्हा तुमच्या मुलांकडून तुम्ही हीच अपेक्षा ठेवाल की नाही? तुम्ही लहान असताना त्यांनी तुमची आजारपणं काढलेली असतात, तुमच्यासाठी जागरंणं केलेली असतात, तुमचे राग रुसवे काढलेले असतात. तुमचे हट्ट पुरवण्यासाठी स्वतःच्या गरजाही मागे सारलेल्या असतात. कदाचित तुमच्यासाठी तुमच्या शिक्षकांची बोलणीही खाल्लेली असतात. मग जेव्हा त्यांचं दुसरं बालपण सुरू होतं तेव्हा तुम्हीही त्यांच्यासाठी त्याग करायला नको का? मला प्रवीण दवणे यांचं एक वाक्य आठवतं की लहान घरात तुमच्या बायकोला जागा असते, नंतर आलेल्या तुमच्या मुलांनाही जागा असते मग त्यांच्या आधीपासून तिथे राहत असलेल्या आईवडिलांनाच फक्त जागा कशी नसते? त्यांना वृद्धाश्रमात का जावं लागतं?