तुमचे विचार आदर्श आहेत, पण व्यवहाराला (सत्य परिस्थितीला) धरून नाहीत. 

परदेशात जाऊन आई-वडिलांना विसरणारी स्वार्थी मुले इ. बोलायला ठीक आहे.. पण वास्तव वेगळे आहे. परदेशात सुद्धा "all is well" असं काही नसतं. अनेक समस्या असतात, त्या समस्यांना सामोरे जाणे-- उतारवयातील आई-वडिलांना जमतेच असे नाही.  तसेच परदेशातील नोकरी/संधी सोडून भारतात मुलांनी यावे असे म्हणणेही धाडसाचे आहे. कारण तशीच आणि तितकीच संधी भारतात त्यांना मिळेलच अशी खात्री नाही. 

आई-वडिलांना आधार देणे जरूरी आहे, त्याचप्रमाणे आपल्या मुलांचे, कुटुंबाचे भविष्यं सुरक्षित करणेही तितकेच जरूरी असते. आणि या दोन्हीचा सुवर्णमध्य काढण्याचा प्रत्येकजण प्रयत्नं करत असतो. परदेशात येऊन आई-वडिलांना विसरणारी / त्यांच्या बाबत बेपर्वा असणारे कुणी माझ्या बघण्यात नाही. 

तुम्ही म्हणले आहे कि अडचणीच्या वेळी आई-वडिलांना बोलावून घेतात, म्हणजे थोडक्यात त्यांना वापरून घेतात इ.  
मग हे स्वदेशात राहणारी मुले करत नाहीत असे म्हणायचे आहे का? 
मला अशी काही उदाहरणे माहीत आहे, ज्यात मुलगा सून नोकरी/व्यवसाय करणार, म्हणून उतारवयात आपल्या नातवंडांचे पालकत्वं घेतात, परत एकदा लेकूरवाळे होतात.  आणि ही नातवंडे जाणत्या वयाची झाल्यावर, त्यांना आई-वडिलांची घरात अडचण होऊ लागते, त्यांच्यासाठी आपला पैसा खर्चं होतो म्हणून चिडचिड होते. त्याभरात आपल्या आईअवडिलांची मानहानी त्यांच्याच घरात राहून केली जाते. 
त्यामुळे स्वदेशात आई-वडिलांजवळ राहणारी मुले चांगली, आणि परदेशात राहणारी वाईट, स्वार्थी असा गैरसमज करून घेऊ नये. 

या प्रश्नाची आणखी एक बाजू ... 
मुलं, सुना स्वार्थी.. आणि आई-वडिल गरीब बिचारे असे एकांगी चित्रण करणे पण चुकीचे वाटते. याच्या उलट परिस्थीती असू शकते. आर्थिक आणि शारिरिक दृष्ट्या सक्षम असे पर्यंत कहींना आपले स्वतंत्र आयुष्य जगायचे असते. आणि ज्यावेळी परावलंबित्व येऊ लागते त्यावेळी मुला-सुनांनी आपली जबाबदारी घ्यावी असे त्यांना वाटते. पण तोपर्यंत मुलांचे आयुष्य बरेच पुढे गेले असते. आई-वडिलांच्या मदतीशिवाय त्यांनी आपल्या संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या असतात. आणि आता त्यांना येऊन कुणी असे म्हणले, की तुम्ही आई-वडिलांना सोडून परदेशी राहणे हा स्वार्थीपणा आहे, तर ते कितपत न्याय्य आहे? 

आपल्याला दूसऱ्याच्या घरात, अंतर्गत काय काय घडले माहिती नसते. फक्तं वर वर दिसणाऱ्या घटना आणि प्रसंगांवरून निष्कर्ष काढणे, म्हणजे कावळा बसला म्हणून त्याच्या वजनाने झाडाची फांदी मोडली,  असे हास्यास्पद विधान केल्यासारखे होईल. 

दोन्ही बाजूंनी समजूतदारपणा दाखवावा असे वाटते. कारण कुठलेही नाते हे कधीच एकेरी (वन वे) नसते. एकाने अडमुठेपणा करावा आणि दुसऱ्याकडून कर्तव्यपालनाची अपेक्षा करावी हे सर्वस्वी चूकीचे आहे.