गोठ्याला 'मांगर' हा शब्द ऐकला आहे. तो बहुधा 'Manger' ह्या इंग्लिश/पोर्ट्युगीज शब्दावरून आला असावा. एक गवाणी असाही शब्द आहे. गुरांची संख्या जास्त असेल तर गोठ्यात ती ओळीने बांधण्याकरता चारपाच खुंट पुरून त्यांना बांबूच्या आडव्या काठ्या लावलेल्या असतात.याला दावणी म्हणतात. गुरे दाव्यांनी खुंटांना बांधून पलीकडे चारा ठेवतात. बांबूंच्या काठ्यांतल्या फटीत तोंड घालून गुरे तो खातात. यामुळे चारा इतस्ततः विखरून कचरा होण्याचे टळते
नदीत छोटासा बांध घालून अडवलेल्या (कोंडलेल्या) पाण्याला कोंड म्हणतात. यालाच 'पोय' हा शब्दही ऐकला आहे. वाहत्या पाण्यात मध्येच असलेल्या खडड्यात साठलेल्या पाण्यालाही कोंड म्हणतात. याशिवाय पावसाळ्यात वाहत्या पाण्यामुळे निर्माण झालेली वाट ती पाणंद, पांदण, पांदी.
चुलीवर भात शिजवताना शिजल्यावर अधिकचे पाणी काढून टाकण्यास 'वेळणे' किंवा 'वाळणे' म्हणतात. यासाठी पातेल्यावर/हंड्यावर झाकण म्हणून वापरायची ताटली म्हणजे वेळणी. तांदूळ धुण्यासाठी वापरायची बांबूची सच्छिद्र टोपली म्हणजे रोवळी. पाणी कमी पडून अर्धवट शिजलेला भात म्हणजे निरजेला, निरजला. वाऱ्यावर उघडा राहून एखादा पदार्थ कडक होणे म्हणजे वारजणे. पिकलेली चिंच साले काढल्यावर विळीवर उकलून चिंचोके, रेषा बाहेर काढायच्या म्हणजे चिंच करलायची. लाठीने पाणी उपसण्यासाठी उघड्या उलट्या छत्रीच्या आकाराचे लाकडी भांडे असे. त्यालाही कोळमे किंवा तत्सम नाव होते. रातांबे फोडल्यावर त्यांतला अतिआंबट रस साठवण्यासाठी एक लांबट असे लाकडी भांडे असे. आंबटपणामुळे धातूचे भांडे चालत नसे. आता बहुतेक प्लास्टिकचे टब वापरतात. रातांब्याला 'भिरंडे' असेही म्हणतात. त्यापासून निघणारे तेल ते भिरंडेल.