भाजीचा फणस चिरताना अगदी बाहेरचे काटेरी आवरण म्हणजे चारखंड. त्याच्या आतला मांसल थर म्हणजे पाटण. त्याला चिकटून गरे आणि अगदी आतला न खाण्याचा भाग म्हणजे माव. पिकलेल्या फणसाचे गरे काढून झाल्यावर उरलेला भाग तसाच्या तसा गुरांना घालायचा नाही. तो चिरून, मध्यम तुकडे करून घालायचा. रसाळ /बरक्या फणसाची 'साठे' करायची. 'कापा' फणस खायला बरा. झाडावरून नुकत्याच तोडलेल्या फणसाच्या देठातून भळभळा चीक निघतो. तो सुकण्यापूर्वी त्याचा गोळा करून कोनाड्यात भिंतीवर डकवून ठेवायचा. चुलीवर न वापरण्याची गळकी भांडी डाग देऊन दुरुस्त करण्यासाठी (डागडुजी) तो जरासा गरम करून वापरायचा.
जमिनीचे सुद्धा वेगवेगळे प्रकार. जूं (जुवें), भाटी/भाट, मिऱ्यें, सडा, काप, भर्डे/भरड, दांडा/दांडे. किनाऱ्यासाठी 'वेळा'. वाळूसाठी पुळण.
गरम पातेले जमिनीवर उतरवताना त्याखाली ठेवायची गवताची गोल चुंबळ म्हणजे 'निवणे' 
'पाखडणे'ला काही ठिकाणी आसडणे म्हणतात.  एखादा चुलीवरचा पदार्थ (चमच्याने न ढवळता) पाखडण्यासारख्या क्रियेने पातेल्याला वरखाली हालवून सारखा करणे याला आसडणे म्हणतात. चमचा वापरला तर तो पदार्थ मोडेल आणि गिच्च गोळा होईल म्हणून. उसळी या अशा आसडून-उसळवून करायच्या.
नारळाच्या झावळीच्या प्रत्येक भागाला वेगळी नावे आहेत. तसेच झावळी विणून केलेल्या प्रकारालाही खास नाव आहे.
गवताचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत.
तयार भात साठवण्याच्या प्रकारांना वेगवेगळी नावे आहेत. पूर्वी पोती किंवा गोण्या सहज उपलब्ध नव्हत्या. गवतच उभे आडवे घट्ट विणून त्यात भात साठवीत. झोडपून आणि मळून भात गवतापासून अलग झाल्यानंतर उरलेले गवत साठवायचे ती उडवी.