दैनंदिन लेखनातील मनोवेधक मध्ये "स्मृतिगंध -६" पाहिले आणि ते वाचावेसे वाटले. त्यातून कोकणातील आणखी काही शब्द कळले, ते खाली देत आहे.
वारंगोळे म्हणजे एक आपला व एक दुसऱ्याचा बैल बांधून दोघांनी जोत करायचे आणि पेरणी करायची.
काही कारणाने दोन बैलांपैकी एक म्हातारा किंवा निकामी झाला आणि दुसऱ्या एखाद्याकडेही अशी परिस्थिती असेल तर ही व्यवस्था दोघांना सोयीची होते.
सवई म्हणजे पावसाळ्यात (कोणाकडून तरी) ४ मण भात घ्यायचे आणि २,३ महिन्यांनी ५ मण भात त्यास परत करायचे.
हे सव्वापट->सव्वाई.-> सवई असे झाले असावे का?
समाराज्ञा म्हणजे गावातील सर्व मंडळी ब्रह्मदेवाजवळ जमतात, सडारांगोळ्यांनी तेथील जागा सुशोभित करतात...तेथेच बाजूला ब्रह्मदेवाच्या नावचे एक शेत आहे. त्यावर कोणाची मालकी नाही, देवच त्याशेताचा मालक. त्यात गावकरी भात पिकवतात व ते तांदूळ प्रसादाच्या जेवणासाठी वापरले जातात.
समाराज्ञा हा समाराधना ह्या शब्दाचा अपभ्रंश असावा.
नंतर टवळ्याची पूजा केली जाते. टवळे म्हणजे मोठा तेलाचा दिवा, त्यात जवळजवळ २ लिटर तेल मावते.