थोडी पुनर्रचना, पाहा कशी वाटते - अतिक्रम वाटल्यास क्षमस्व.

सांभाळा ,सांभाळा सयांनो
  जरा पदर सांभाळा
अन् सावरता सावरता
  रंग सांडला जांभळा ॥

पदरा आड, सुटली गाठ,
   काय करू, धावा धावा
तिकडे वाजला पावा,
  घुमू लागला पारवा ॥

डोलती गुंगुनी पहा या
  चित्त-पावन ललना
येईल आता निळा-सावळा,
  करीती संगाची कल्पना ॥

थबकल्या, थरथरल्या नि
  टवटवल्या की मनोमनी
चढला रंग ताजा हिरवा
  आननी अन् पानोपानी ॥

झटकुनि पिवळी पाने,
  डोलती आंब्याची तोरणे
बहरला बहावा अंगांगी
  पीत झुपक्यांचे डोलणे ॥

नानारंगी फुले फुलवुनी
  पुन्हा ऋतुराजाचे रंगणे
मरवा चंपक सुरंगि चंदन
 सुगंधीं पवनाचे न्हाणे ॥

गोमयांचे सडे अंगणी
 दारी रंगली रांगोळी
तबके सजली रंगांनी
 होळी आली रे होळी  ॥

निळाई मोहक येईल घेउनि
 संगे गोपगोपी बाळा
लगोलगी गं चला सयांनो
 सप्तरंग मुक्त  उधळू या ॥

कान्हा संगे रंगी रंगुनी
 देहभान विसरू या
शतजन्माची आस मनीची
 चला आज पुरवू या ॥