ज्ञानेश्वरीबद्दलचे वर्णन योग्य असले तरी ज्ञानेश्वरी याच्याहीपलिकडे बरेच काही सांगते.
१. गीतेमधल्या श्लोकांचा साधासरळ अर्थ, उपमा - दृष्टांताच्या सहाय्याने सविस्तर सांगते.
२. गीतेत संक्षेपाने आलेल्या काही संकल्पना अधिक विस्ताराने सांगते. उदा. तेराव्या अध्यायात "अहिंसा" या एका शब्दासाठी जवळजवळ ७०-७५ ओव्यांचा विस्तार आहे. त्यात अहिंसेबद्दल प्रचलित असलेली मते सांगून नंतर त्यांचे (ज्ञानेश्वरांचे, गीतेत श्रीकृष्णाचे, व्यासाचे असे खास मत दिसत नाही), मत सांगितले आहे.
३. गीतेत अजिबात उल्लेख नसलेल्या काही गोष्टी त्यांनी विस्ताराने सांगितल्या आहेत. उदा. सहाव्या अध्यायातले ध्यानधारणा करण्यासाठी स्थळ कश्या प्रकारचे असावे इथपासून ते थेट समाधी लागल्यावर काय अनुभव येतात येथपर्यंत अत्यंत सविस्तर वर्णन आहे.
४. काही ठिकाणी शंकराचार्यांनी मांडलेल्या अद्वैत मताविरुद्धही त्यांनी लिहिले आहे. हेच मत पुढे अमृतानुभवात जास्त खोलात जाऊन मांडले आहे.
५. गीतेमध्ये अनेक ठिकाणी तर्कनिष्ठ व्यक्तीला कोणते आक्षेप घेता येऊ शकतील त्यांचा विचार करून त्यांचे निरसन केले आहे, जे मूळ गीतेत अजिबात नाही. हे थोडेसे ब्रह्मसूत्रासारखे आहे. ब्रह्मसूत्रांमध्ये निरनिराळ्या उपनिषदांमध्ये असलेल्या विसंगती/ शंका/आक्षेप उपस्थित करून त्यांचे निरसन केले आहे.
६. अनेक ठिकाणी श्रीकृष्णाचे/व्यासांचे मत जवळजवळ बाजूला ठेवले आहे. उदा. "हतो वा प्राप्यसी स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महीम" (युद्धात मेलास तर स्वर्गात जाशील जिंकलास पृथ्वीचे राज्य भोगशील" आणि "मा फलेषू कदाचन" (तू कर्माच्या फळाची इच्छा करू नकोस) ही दोन विधाने परस्परविरोधी आहेत. यात ज्ञानेश्वरांनी पहिले विधान जवळजवळ बाजूला ठेवले आहे. अगदी जेवढ्यास तेवढा अनुवाद केला आहे. मात्र "तू फळाची अपेक्षा करू नकोस हा संदेश मात्र सर्व ज्ञानेश्वरीमध्ये वारंवार दिला आहे.
७. अनेक देवतांची उपासना करणाऱ्या लोकांची तसेच स्वर्गाच्या आशेने यज्ञयाग करणाऱ्यांची ज्ञानेश्वरांनी अत्यंत कठोर शब्दांत निर्भत्सना /निर्भर्त्सना (नक्की काय बरोबर आहे ?) आहे. दोन्ही वर्णने मूळातून वाचण्यासारखी आहेत, विस्तारभयास्तव इथे देत नाही.
८. ज्ञानेश्वरांनी शेवटी संदर्भसूची दिलेली नाही, पण त्यात अगदी आर्यभटीयामधलेही उल्लेख आहेत. गीतेवर भाष्य लिहिणाऱ्याने गणित/खगोलशास्त्रावरचे ग्रंथही वाचले असावेत हे खरेच आश्चर्य आहे.
याप्रमाणे इतर अनेक वैशिष्ट्ये उदाहरणांसहित सांगता येतील. तो स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
जाता जाता - ज्ञानेश्वरांच्या काळात वेद, गीता, उपनिषदे वगैरेंबद्दल भाष्य लिहायचे तर संस्कृतात असा प्रघात होता. तो ज्ञानेश्वरांनी मोडला. अरबी, फारसी वगैरे भाषा त्यावेळी महाराष्ट्रात नव्हत्या.
विनायक