तामीळ भाषेत हकारयुक्त व्यंजने नाहीत. त्यामुळे,   थ. ध. ढ आदी उच्चार लिहिण्याची सोय नाही.   त्यामुळे रोमन लिपीत टीएच्  लिहिले की त्याचा उच्चार थ किंवा ठ होण्याची सुतराम शक्यता नाही. तसेच डीएच्  चा उच्चारही ध किंवा ढ होत नाही. कारण हे उच्चारच तामीळ भाषेत नाहीत. तामीळभाषकांना  इंग्रजी लिपीतले टी हे अक्षर 'ट' आणि 'त' या दोन्ही उच्चारांसाठी वापरण्याची गरज नाही.   त्यामुळे 'लता'चे स्पेलिंग मराठी लोक करतात तसे लाटा असे न करता ते एल्एटी‍एच्ए म्हणजे ळाठा असे करतात आणि लता असे उच्चारतात.  असे करण्यात ते काही चूक करतात असे मुळीच नाही. तामीळभाषकाने इग्रजीत लिहिलेल्या गुरुनाढम्  Gurunadham या शब्दाचे तामीळ उच्चारण गुरुनादम् असे होते.   मूळ शब्द माहीत असला की इंग्रजीत लिहिलेली तामीळ नावे बिनचूक वाचता येतात.

हिंदीमध्ये,  मराठीत आहेत  असे ऐ (=अई) आणि औ(=आऊ) हे उच्चार नाहीत. त्या अक्षरांचे उच्चार हिंदीभाषक अनुक्रमे  ऍ आणि ऑ असे किंवा त्यांच्या आसपासचे  करतात. कैफ़‍चा (उच्चार कॅएफ़‍  आणि  मौजचा उच्चार मॉओज असे होतात.  देवनागरीत लिहिलेल्या एखाद्या ऍकारयुक्त किंवा ऑकार युक्त व्यंजनावर अनुस्वार आला, तर हिंदीत तो चंद्रबिंदू समजला जातो, आणि अर्ध‌अनुनासिक समजून नाकात उच्चारला जातो.  बँक चा उच्चार हिंदीभाषक बअंऽक असा करतील.  माँजीचा उच्चार मराठीत मॉंन्जी असा तर हिंदी माआंऽजी असा होतो.  प्रत्येक भाषेची लिपी त्या त्या भाषेसाठी उपयुक्त असते.  त्या भाषेत लिहिलेले शब्द त्यांच्या पद्धतीनेच वाचावेत.

ईस्ट इंडिया कंपनीचे महाराष्ट्रात उतरलेले  भाषापंडित आणि दक्षिणी भारतात गेलेले पंडित वेगवेगळे होते. त्यांनी त्या त्या प्रांतात शब्द जसे उच्चारले जातात तसे जास्तीतजास्त चांगल्या पद्धतीने कसे व्यक्त करता येतील हे पाहून शब्दांची इग्रजी स्पेलिंगे ठरवली.

भायखळा हा शब्द रोमन लिपीत लिहायचा ठरवला, तर तीन अडचणी येतात. इंग्रजीत भ, ख, आणि ळ ही तीनही उच्चार नाहीत, आणि त्यांच्यासाठी मुळाक्षरेही नाहीत. पण 'भाय' नसला तरी 'बाय' आहे, ख नसला तरी सी आहे, आणि ळ नसला तरी डबल-एल आहे. त्यामुळे भायचे स्पेलिंग By हे नक्की झाले.  खळाचे cala केले तर कॅला होईल, आणि culla केले तर क्कला या आसपासचा उच्चार होईल.  शेवटी भायखळा या शब्द्दाचे कमीतकमी दोष असलेले स्पेलिंग Byculla  हेच ठरते.  (Cula=क्यूला,  Culla= क्कला.)  बायक्कला हा भायखळ्याचा सर्वात जवळचा उच्चार. 

असल्या स्पेलिंगांबद्दल न दाक्षिणात्यांनी न उत्तरी भारतीयांना आपल्याला नावे ठेवली, आपणही का ठेवावीत?.