अरबी शब्द 'मशवरा किंवा मशविरा' म्हणजे सल्ला. त्यामुळे मशीर किंवा मुशीर म्हणजे सल्लागार (मंत्री).  अल्, उल्, उस्, उद् हे सर्व शब्द षष्ठीचे प्रत्यय म्हणून वापरले जातात.  मुल्क म्हणजे मुलुख आणि दौला म्हणजे राजवट, राजघराणे वगैरे.  त्यामुळे मुशीरुद्दौला म्हणजे त्या राजघराण्याला सल्ला  देणारा  वजीर.  मुशीर-उल-मुल्क म्हणजे त्या राज्याचा सल्लागार. 'मुशीर' चा मराठीत येताना मुषीर झाला.  म्हणजे खरोखरच अरबी भाषेतले 'श'युक्त शब्द मराठी 'ष' घेऊन येतात, असे दिसते आहे. 

भारतीय संगीतात प्रामुख्याने तीन प्रकारची वाद्ये असतात. तालवाद्ये, तंतुवाद्ये आणि सुषीर वाद्ये.  सुषीर म्हणजे ज्या वाद्यांच्या छिद्रांमधून इकडून तिकडे हवा गेल्यामुळे ध्वनी निर्माण होतो अशी वाद्ये. उदा० बासरी, क्लॅरोनेट, सनई, बाजाची पेटी वगैरे. या वाद्यांच्या प्रकारनामातला सुषीर हा शब्द मूळ अरबी असावा असे मला नेहमी वाटत असे. कारण, त्या शब्दाची सु+षीर अशी फोड करून काहीच अर्थलाभ होत नव्हता. शेवटी एकदा ठरवले आणि 'सुषीर'च्या उगमाचा शोध लावला. 

अमरकोशात छिद्र या अर्थाचे १५ शब्द आहेत.
कुहरम्, शुषिरम् (सुषिरम्),  विलम् (बिलम्),  छिद्रम्, निर्व्यथनम्, रोकम्, रन्‍ध्रम्,  श्वभ्रम् (स्वभ्रम्), वपा, शुषिः (सुषिः), हे ते शब्द.

कुहरं शुषिरं विवरं बिलम् --अमरकोश १.८.१ची दुसरी ओळ
छिद्रं निर्व्यथनं रोकं रन्‍ध्रं श्वभ्रं वपा शुषिः  -- अमरकोश १.८.२ची पहिली ओळ

यावरून सुषि‍ किंवा सुषि‍र  म्हणजे छिद्र हे समजते. मग छिद्र असलेली गोष्ट हा अर्थ कोठून आला?  त्यासाठी अमरकोशाची  पुढची ओळ आहे.

सरन्‍ध्रे शुषिरं त्रिषु‍ ।। २ ।।... अमरकोश १.८.२ची दुसरी ओळ.

तिन्ही लिगांत (त्रिषु‍) चालणारे सरन्‍ध्र आणि शुषि‍र हे समानार्थी शब्द आहेत.  थोडक्यात काय, तर सुषि‍र म्हणजे छिद्र असलेली वस्तू. मराठी आणि हिंदीत हा शब्द दीर्घ 'षी'  बनून आणि 'शु'चा 'सु' बनून आला.  त्यामुळे सुषीर वाद्ये म्हणजे नेमकी कोणती वाद्ये याचा उलगडा झाला.

(टीप : इंग्रजीत हंचबॅक म्हणजे कुबड किंवा कुबड असलेला माणूस; अगदी तसेच, सुषीर म्हणजे छिद्र किंवा छिद्र असलेली वस्तू.  )