खुश्‍क या फारशी शब्दाप्रमाणे मराठीत 'ष युक्त झालेले आणखीही काही फार्सी शब्द आठवले.  गोशा, लश्‍कर, करश्‍मा. चश्‍मा हे शब्द मराठीत येताना अनुक्रमे गोषा, लष्कर, करिष्मा आणि चष्मा बनून येतात. शरीक(=सामील) आणि शुतुर(=उंट) हे शब्द मराठीत फारसे वापरात नाहीत, पण जेव्हा क्वचित वापरतात तेव्हा ते षरीक आणि षुतुर असे झालेले असतात.

फारसी 'श'चा  'छ' झालेली उदाहरणेही आढळतील.  'शानशौकत'चे मराठी छानछोकी होते.

उत्तरी भारतीय बोलीभाषांमध्ये 'ष' चा 'ख' होणारी अनेक उदाहरणे सापडतील. लक्‍ष्मण हा लखमन बनतो.  गुजरातीत क्‍षमासाठी खमा हा शब्द आहे. त्यावरून कुशल असो अशा अर्थाचा खम्मा शब्द बनतो. 'घणी खम्मा' (खूप खूप कुशल असो) हा शब्दप्रयोग गुजराथेत खूपदा कानावर पडतो.

गुजराथी लोक श-ष-स यांचा उच्चार अनेकदा 'स'करतात, पण  विकल्पाने 'ह'सुद्धा करतात.  सौराष्ट्रातल्या एखाद्या स्त्रीच्या तोंडात  'सासू' हा शब्द पाठोपाठ चार वेळा आला तर तिने अगदी नकळत तो शब्द सासू, साहू, हासू आणि हाहू असा वेगवेगळा उच्चारला तर आश्चर्य नाही. 

बंगालीभाषक श-ष-स यांचे उच्चारण हमखास 'श' करतील, तर असमियाभाषक जर्मन भाषेतल्या घसा खरवडून उच्चारायच्या (किंवा उर्दूतल्या नुक्तावाल्या)  ' ख़ '  सारखा. तमिळभाषक ज-श-स  या तिन्ही अक्षरांचे उच्चारण 'च' करतात, तर  'क्ष'चा  उच्चार ट्च  असा. त्यामुळे तमिळमध्ये लक्ष्मीचा उच्चार इलच्चुमि‍ होतो.

हे सर्व विचारात घेतले तर केवळ मराठीभाषकच 'ष'चा उच्चार योग्य करतो असे बाटते..... अद्वैतुल्लाखान