भविष्यात ष हे अक्षर अस्तित्वात असेल का, या पेक्षा महत्वाचा प्रश्न  भविष्यात ष हे अक्षर अस्तित्वात असण्याची गरज आहे का ?
माझ्या मते गरज नाही. अक्षरे ही ध्वनी ची दृष्य चिन्हे असतात.  जेव्हां दोन ध्वनी एकमेकांच्या इतके जवळ येतात कि त्यांच्यातला फरक ओळखणे पण कठीण होते, तेव्हां त्यांच्या करता दोन वेगळ्या चिन्हांची गरज नसते. व म्हणून भविष्यात ष किंवा श या पैकी कोणतेही एक अक्षर बाद करावे. श जास्त प्रचलित आहे म्हणून ष बाद झालेले असेल,  किंबहुना बाद होण्याच्या मार्गा वर आहेच.

एक जरा वेगळे उदाहरण - मालकंस मधला गांधार कोमल आहे तर देशकार मधला गांधार शुद्ध आहे. यात सहज कळणारा फरक आहे. म्हणून या दोघां करता दोन वेगळी चिन्हे असणे ठीक आहे. पण मालकंस मधला कोमल गांधार व दरबारी कानड्यातला कोमल गांधार यात फार फरक नाही म्हणून या करता वेगळी चिन्ही वापरत नाहीत.  फरकच करायचे झाल्यास 'फ' पण दोन प्रकारचे असतात. ओठ न मिटता, खालचा ओठ दाताला लावून काढलेला 'व' सारखा 'फ', व दोन्ही ओठ मिटून मग ते उघडून काढलेला 'भ' सारखा 'फ'. इंग्लंडला गेल्या वर लक्षात आले कि माझे नांव सांगताना उच्चार प्हंडित (phandit) असा करायचा. आपण करतो तसा "पंडित" असा केला तर त्यांना ते bandit असे ऐकू येते.

साधारणत: भाशेची वाटचाल जास्त सुलभ होण्या कडे असते.  इथे मी मुद्दामून भाषेची असे लिहीण्या ऐवजी भाशेची असे लिहीले. त्याने तो ब्द तुम्हाला समजण्यात काहीही त्रास झाला नाही.  हिंदीत व इंग्रजीत पण फक्त एकच 'च' आहे, चहातला 'च'. चकचकीत मधला 'च' हिंदीत वा इंग्रजीत नाही. तसेच या दोन्ही व इतर अनेक भाषांमध्ये 'ळ' नसतो. त्याने त्या भाषांचे काहीही अडत नाही. वगैरे. भारंभार चिन्हे केल्याने भाषा समृद्ध होत नसते.