अक्षरे कमी करण्यासाठी सूचना :
१. अ आणि आ या दोन अक्षरांची गरज नाही. एक पुरे. आगदी म्हटले काय किंवा अगदी; अर्थ समजतो.
२. ऍची गरज काय? हिंदीप्रमाणे बैंक किंबा गुजरातीप्रमाणे बेंक लिहिले की अर्थ समजतो. किंवा थॉमस कॅंडीने 'ऍ' आणण्यापूर्वी आपण लिहीत असू, तसे ब्यांक लिहावे.
३. ऑची गरज काय? बाँब हा शब्द हिंदीप्रमाणे बम किंवा गुजरातीप्रमाणे बोंब असा लिहिला तरी अर्थ समजतो. किंवा थॉमस कॅंडीने 'ऑ' आणण्यापूर्वी आपण लिहीत असू, तसे ब्ब्वांब लिहावे.
४. इ आणि ई या दोन अक्षरांची गरज नाही. एक पुरे. इडलिंबू म्हटले काय किंवा ईडलिंबू ?; अर्थ समजतो.
५. उ आणि ऊ या दोन अक्षरांची गरज नाही; एक पुरे. उर्मिला म्हटले काय किंवा ऊर्मिला; नाव घेतले की की तीच मातोंडकर आठवणार.
६. ऋ-ॠ दोन्ही नकोत; ॠषीला रुषी किंवा रिषी म्हटले तरी अर्थ समजतो. कृ हा शब्द क्रु किंवा क्रि असा लिहिला तरी चालण्यासारखे आहे. समजतो.
७. ऌ आणि ॡ या दोघांची गरज नाही; कॢप्ती हा शब्द क्लुप्ती असा लिहिला की काम भागले.
८. विसर्गचिन्हाची अजिबात गरज नाही. अहा, आहा, इहि, ईहि, उहु, ऊहु, एहे, ऐऽहि, ओऽहो, औऽहु असे लिहिले की काम भागते. कःपदार्थ हा शब्द कप्प्पदार्थ असा लिहावा, आणि दुःख हा शब्द दुक्ख असा.
९. इंग्रजीत क आणि ख असे दोन वर्ण नाहीत, मराठीतही एक पुरे. काकाच्या काखेत म्हणायच्या ऐवजी काकाच्या काकेत किंवा खाखाच्या खाखेत म्हटले तरी काकाला कळेल.
१०. या नियमाने ग-घ, च-छ, ज-झ, ट-ठ-त-थ, ड-ढ- द-ध, प-फ, ब-भ, ल-ळ ही दोनदोन, चारचार अक्षरे नकोत; एकेकच पुरे. म्हणजे टाटांना पारशी लोक जसे ताता म्हणतात, तसे म्हणायला आपण मोकळे.
११. ङ-ञ-ण-न यांच्यापैकी एक न पुरे. इंग्रजीत नाही का पुरत ? जाने न नेने अशा पामराला बुझावू शके ना विधाता तयाला !
१२. श-ष-स यांच्यापैकी एकच ठेवावे. इंग्रजीत फक्त 'एस्' आहे, तो कसा काम भागवतो?
१३. हिंदी-इंग्रजी-संस्कृतमध्ये दोन च़ नाहीत, मराठीतही नकोत.
१४. हिंदी-संस्कृतात दोन झ़ नाहीत, मराठीतही नकोत. डोळ्यावर झ़ापड आली असताना कुणी झापड मारली तरी जाग येणार नाही. मुळात 'झ़'च़ नको आहे, एक ज पुरे.
१५. इंग्रजीत आणि संस्कृतमध्ये दोन फ नाहीत. मराठीत का हवेत ? फ़ादरला च़ादऽरप्रमाणे प्हादर म्हटले तर त्याला समजणार नाही?
१६. ॐ हे अक्षरच नको, ओम् असे लिहिता येते की ?
१७. श्री नको, श्रीने काम चालवावे.
१८. उर्दूत मात्रा-वेलांट्या कोठे आहेत ? लहर हा शब्द लेहर, लेहेर, लहेर असा कसाही वाचता येतो. मराठीत मात्रा-वेलांट्या हव्यात?
१९. आणि जोडाक्षरे कशाला हवी आहेत ? नाट्याचार्य म्हटले काय किंवा हल्ली अनेक ठिकाणी लिहिलेले दिसते तसे नाटयाचार्य ? वाचणाऱ्याने अर्थ समजून वाचावे. इत्यलम् !
मात्र या सुधारणा टप्प्याटप्याने कराव्यात, एका फटक्यात केल्या तर विद्वानांची नाराजी ओढवून घेतली जाण्याची शक्यता आहे. अर्थात त्यांच्या नाराजीला विचारते कोण ?
मार्क ट्वेनने रोमन लिपीत टप्प्याटप्प्याने करावयाच्या अशाच काही सुधारणा सुचविल्या आहेत. त्या दुवा क्र. १ येथे पहाव्यात.