'टाटा'चा मूळ उच्चार 'ताता'च आहे, यात काहीच शंका नाही.

संपूर्ण हिंदुस्थानावर सम्राट अशोकानंतर एकछत्री अंमल  इंग्रजी सत्तेचाच झाला. तो अंमल जेव्हा सुरू झाला त्या काळापर्यंत मराठीभाषकांचा आणि अ-मराठी लोकांचा भाषिक संपर्क तुटल्यासारखा असणार. राजस्थान, कर्नाटक आणि थोडीफार काशी-प्रयाग-दिल्ली-मथुरा येथील विशेष नामे सोडल्यास मराठीभाषकाला अन्य प्रातांतील नावांचे खरे उच्चार काय आहेत याची माहितीच नसणार.

इंग्रज आल्यानंतर मात्र परिस्थिती पालटली. अभ्यासक्रमात इतर प्रांतांचे भूगोल आणि इतिहास शिकायची संधी उपलब्ध झाली. गावांची नावे आणि व्यक्तींची नावे मराठी माणसाच्या वाचनात इंग्रजी माध्यमाच्या द्वारे येऊ लागली. इंग्रजांनी रोमन लिपीच्या मर्यादा विचारात घेतल्या आणि कलकाताचे स्पेलिंग कलकत्ता केले, उडीशाचे ओरिसा केले आणि तेच मराठीत रूढ झाले. मुरारजीचे मोरारजी केले, वसूचे बोस, शुक्लचे शुक्ला, तिरुअनंतपुरम्‌चे त्रिवेंद्रम आणि ताताचे टाटा केले. त्या त्या प्रांतात या शब्दांचे मूळ उच्चार काय आहेत हे मराठी माणसाला कळायला काहीच मार्ग नसावा.  आणि मूळ उच्चार समजण्याची आजही काही गरज आहे असे मुळीच नाही. 'टाटा'चा मूळ उच्चार 'ताता' आहे असे समजल्यानंतर आपण ताता थोडेच  लिहिणार आहोत? सुभाषंंचंद्र बोसांना वसु, विद्याचरण शुक्लांना शुक्ल, तपन सिन्हांना तपनसिंह, जगजीत सिंगांना जगजीतसिंह, मोरारजी देसाईंना मुरारजी, माधवराव सिंदियांना शिंदे  थोडेच म्हणणार आहोत. 

इंग्रजी भाषेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हे ज्ञान पोचले हीच मोठी गोष्ट आहे.  इंग्रजांनी आपला इतर प्रांतीयांच्या नावांशी परिचय करून दिला हे त्यांचे आपल्यावर  उपकारच आहेत.