कृ आणि इतर अक्षरांचा उच्चार नेमका कसा आहे ते अद्याप विसरले गेलेले आहे असे वाटत नाही.
कृ चा उच्चार क्रि आणि क्रु ह्या दोन्हीच्या मध्ये आहे असे माझ्या (आणि माझ्याबरोबर शिकलेल्या इतर अनेकांच्या) ऐकण्यात आहे. कृती ऐवजी क्रुती लिहिणे हे विनोदाच्या स्वरूपात इ. सहावीत केल्यावर शिक्षकांनी तो उच्चार आम्हाला नीट शिकवलेला आहे. तो शब्दात लिहिणे अशक्य नसले तरी थोडे कठीण आहे. क्रि म्हणताना ओठांची ठेवण स्मितहास्य केल्याप्रमाणे किंचित अर्धचंद्राकृती होते. क्रु म्हणताना ओठांचा आकार चुंबन घेतल्यासारखा काहीसा चंबूप्रमाणे होतो. मात्र कृ म्हणताना ओठ उघडे पण निर्विकार राहतात. त्यांचा कुठलाच विशिष्ट असा आकार होत नाही. (हे वर्णन नेमके आहे असा दावा नाही. ह्याहून नेमके वर्णन इतरांना नक्की करता येईल.) शिवाय कृ दृ गृ इत्यादीचे 'वजन' क्रु द्रु ग्रु ह्या जोडाक्षरांप्रमाणे (मागच्या अक्षरावर जोर देणारे) नसून लघ्वक्षरासारखेच आहे. उदा शिवमहिम्नस्तोत्रातील खालील ओळी पाहाः शिखरिणी वृत्तात : यमाचा मानावा नमन समरा भारत ल ग ह्यात शेवटी ल-ल-ग असा लघुगुरुक्रम येतो हे लक्षात घ्यावे
महिम्नः पारं ते परमविदुषो यद्यसदृशी
स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः ।
अथाऽवाच्यः सर्वः स्वमतिपरिणामावधि गृणन्
ममाप्येष स्तोत्रे हर निरपवादः परिकरः॥ १॥
ह्यात ठळक केलेले दृ किंवा गृ ह्यांचे वजन पाहिले तर ते केवळ लघ्वक्षराइतकेच असल्याचे दिसेल. सदृश चा उच्चार सद् - ऋश असा (किंवा सद्दृश - दोन द असल्यासारखा जोडाक्षराप्रमाणे) द वर अतिरिक्त जोर देऊन होत नाही, तर अगदी हलका सदृश असा होतो. जोडाक्षराप्रमाणे त्यातला ऋ वेगळा करून उच्चारता येत नाही. स्वराप्रमाणे मिसळूनच उच्चारायला लागतो.
मात्र भविष्यात हे विसरले जाऊ नये ही कळकळ वाटणे स्वाभाविक आहे.
उच्चाराचा नेमकेपणा टिकवून ठेवण्यासाठी जगभरच्या प्रगत (म्हटल्या जाणाऱ्या) भाषांसाठी तेथले तज्ज्ञ आणि विचारवंत कोठले उपाय सुचवतात आणि ते ऐकले/केले जातात ते जाणून ते (किंवा तसे) उपाय मराठीसाठी कसे करता येतील म्हणून काय करायला लागेल त्यासाठी काही सुचवणी आल्या तर चांगले होईल असे वाटते.
आता मराठी जाणणारे लोक जगभर वास्तव्यास आहेत. तेथे असे कोठले उपाय राबवले जातात, ते मराठीसाठी कसे करता येतील याचा विचार त्यांच्या मनात साहजिकच येत असणार, ह्याची खात्री वाटते.
शब्दकोश, शुद्धलेखन, व्याकरण ह्याचा नेमकेपणा टिकवण्यासाठी उपाय केले जातच आहेत, त्यात ह्याचाही विचार करता येईल असे वाटते.