माननीय गजाननजी
तुम्ही ज्या प्रक्रियेला केवळ दुसर्याचा फुगा फोडणे असे म्हणता त्याला एकाद्या विषयाच्या इतर बाजू समोर आणणे, त्या वर चर्चा करणे, असे पण म्हणतात. विषयाला इतर बाजू असतात म्हणून तर चर्चा होते / करावी लागते. अन्यथा त्याला "कोरस" असे म्हणतात. काल झालेल्या CWC च्या बैठकीत जसे सगळ्यांनी एकमुखाने राहुल यांचा अजिबात दोष नाही असे सांगितले, तसे.
केवळ काही ज्ञानी लोकांना वेगळे उच्चार माहीत आहेत, कुठल्या तरी ग्रंथात ते लिहीले आहेत, म्हणून ते टिकत नाहीत. "पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा" या गाण्यात बाबूजी "ष" चा उच्चार "श" पेक्षा वेगळा करीत असत हे मी अनुभवलेले आहे, ध्वनी मुद्रित आहे. पण आपण बहुतेक लोक तसे करीत नाही. म्हणून 'ष' हा वेगळा उच्चार माहीत असून सुद्धा नामशेष होण्याच्या मार्गाला आहे, किंवा झालाच आहे. आजच्या पीढीत आपण त्याचा वेगळा उच्चार किमान सांगू तरी शकतो, आणखीन दोन-तीन पिढ्यां नंतर कदाचित आज आपण जसे इतर काही उच्चार कसे आहेत हे कोणी सांगू शकेल का, अशी चर्चा करीत आहोत तसेच 'ष' चा उच्चार काय आहे हे कोणी सांगू शकेल का, अशी चर्चा होऊ शकते. या उलट, चमचमीत व चहा या दोन शब्दांत 'च' याचे दोन वेगळे उच्चार आपण बहुतेक सर्वच करतो, म्हणून ते सध्या तरी नामशेष होण्याच्या यादीत नाहीत.
कोणत्या तरी इंग्रजी शिकविणार्याची एक जहिरात महाराष्ट्रात असे - त्यांना म्हणे Had या एका शब्दाचे ५७ अर्थ माहीत होते, जे इंग्रजांना सुद्धा (म्हणे) माहीत नाहीत. पण हे ५७ अर्थ जर वापरात नसतील तर काय उपयोग आहे असल्या पुस्तकी अर्थांचा ? भाषेचा प्रवास अडगळ कमी करण्या कडे होत असतो. ती अडगळ कृत्रिम प्रकारे टिकवण्याची गरज नाही, व प्रयत्न केला तरी तसे होणर पण नाही.