संस्कृत मुळात शुद्ध भाषा नसावी, म्हणजे तिला अपरिवर्तनीय असे व्याकरण नसावे.  पाणिनीने तत्कालीन वापरातल्या संस्कृत भाषेला निश्चि‌त स्वरूपाच्या व्याकरण नियमांत बसविले. त्यासाठी त्याने ग्रामीण भाषांची आणि काही आधीच्या  व्याकरणकारांच्या मतांची दखल घेतली होती, हे त्याच्या अष्टाध्यायीवरून कळून येते.  पाणिनीनंतरची भाषा ही शुद्ध स्वरूपातली संस्कृत म्हणून ओळखली जाऊ लागली.  संस्कृत भाषेत शब्दांची भर पडली, पण व्याकरणाच्या नियमांत आजतागायत  काहीही बदल झालेला नाही.  या अर्थाने संस्कृत भाषा ही शुद्ध भाषा आहे.

संस्कृत ही देवभाषा आहे, म्हणजे देव या भाषेचा वापर करीत.  संस्कृत पंडित कै. वि. कृ. श्रोत्रिय  यांच्या 'वेदांतील गोष्टी' या इ‌. १९३५मध्ये प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांतले पहिले वाक्य 'पूर्वी देव नावाची माणसे होती' हे आहे. उघडच आहे की,  देव म्हणजे गॉड नव्हे. (हे पुस्तक प्रसिद्ध होण्यापूर्वी वेदांत गोष्टीही आहेत, हे बहुतेकांना माहीत नव्हते. )  या अर्थाने संस्कृत ही देवभाषा आहे.

मायभाषा म्हणजे मातृभाषा नव्हे. ज्या भाषेने भारतातल्या सर्व भाषांना आपले डी‌एनए, अर्थात  शब्द दिले, ती भाषा.  तामीळ, तेलुगू, कन्नड, मलयाळम यांसकट सर्व भारतीय भाषात कमीअधिक प्रमाणात संस्कृत शब्द वापरले जातात. उत्तरी भारतातील तमाम भाषा संस्कृतपासून निघाल्या असे एक मत आहे.  आणि त्याउलट अनेक प्राकृत भाषांचे संस्कारित रूप म्हणजे संस्कृत भाषा, असेही एक मत आहे. परंतु सर्व भारतीय भाषांत संस्कृत शब्द आढळतात, याबद्दल दुमत नाही. अर्थात संस्कृत ही भारतीय भाषांची माय आहे.