संस्कृत संगणकासाठी खूप अनुकूल भाषा आहे असे म्हणणाऱ्यांचे क्रेडेन्शल्स काय आहेत असा जळजळीत प्रश्न वरील पत्रलेखकाने विचारला आहे.
त्या आधी, संगणकासाठी अनुकूल भाषा म्हणजे काय याचा विचार करयला हवा. सी - फोर्ट्रान-पास्कल-जावा या प्रमाणे प्रोग्रामिंग करण्यासाठी संस्कृत उपयुक्त भाषा आहे असे कोणी म्हटलेले नाही. त्यामुळे येवढ्याच मर्यादित कक्षेत विचार करणे चूक ठरेल.
तर संस्कृतची संगणकाकरिता अनुकुलता ही नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, मशीन ट्रान्स्लेशन, आर्टिफिशल इंटलिजन्स इत्यादी विषयात आहे. तुम्हाला जर तुमच्याशी संवाद साधू शकणारा, तुमचे बोलणे समजणारा आणि तुमच्याशी बोलू शकणारा यंत्रमानव बनवायचा असेल, तर अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक भाषांपैकी संस्कृत भाषा त्याला शिकवणे सर्वात सोपे असेल, असा याचा एक अर्थ आहे. (अर्थात त्याच्याशी संवाद साधण्यासाठी तुम्हालाही संस्कृत शिकावी लागेल हा भाग वेगळा, आणि तुमच्यासाठी संस्कृत शिकणे हे सर्वात सोपी गोष्ट असेलच असं नाही !! ) वरील सर्व कार्यांसाठी उपरोल्लेखीत प्रोग्रामिंग लँग्वेजिसचा फारसा उपयोग नाही हे पत्रलेखकास बहुधा मान्य व्हावे. खरे पाहता संस्कृतच्या अनुकूलतेविषयीचे हे मत पाश्चात्य विद्वांनांनीच प्रथम मांडले. त्याशिवाय, संस्कृतचा अभ्यास जर्मनीसरख्या पाश्चात्य देशात जेवढा चालतो, त्या तुलनेत तो आपल्याकडे किती चालत असेल हा प्रश्नच आहे.
अर्थात संस्कृतबद्दलचे हे संगणकीय मत बरेच जुने म्हणजे १९९० च्या आसपासच्या / आधीच्या काळातील आहे. मधल्या काळात या विषयांमध्ये जे विशाल संशोधन झाले आहे, त्यानंतर सध्या याबाबत काय विचार आहेत ते माहीत नाही. पण संस्कृतच्या अनुकूलतेसंबंधातील हे मत या संदर्भात घ्यावयाचे हे लक्षात घेतले पाहीजे.