तुम्हाला गुरू म्हणजे कात्यायन असे म्हणायचे आहे का? तर शक्य आहे. कात्यायनाने सांगितले आणि शिष्याने लिहिले, आणि लिहिताना चूक केली; किंवा पुढील आवृत्ती काढणाऱ्याने चुकीचे छापले. असे असल्यास मूळ ग्रंथाच्या उपलब्ध आवृत्तीत चूक असल्याने शब्दकोशातही ती चूक झाली असे म्हणता येईल.
युनिकोडीकरणाचा इथे संबंध नसावा. माझ्याकडे आत्ता मोनियर मोनियर-विल्यम्स ग्रंथरूपात आहे, मात्र ती आवृत्ती मूळ ग्रंथाची फोटोकॉपी नाही. (फोटोकॉपी मी माझ्या पुण्याच्या घरात ठेवली आहे). जी आवृत्ती आहे ती पंडित ईश्वर चंद्र नावाच्या लेखकाने संपादित केलेली, त्याने विदित केल्याप्रमाणे भरपूर प्रमाणात भर टाकलेली, सुधारित आणि दिल्लीच्या परिमल प्रकाशनाने प्रसिद्ध केलेली आवृत्ती आहे. या आवृत्तीतील शब्दांचे पृष्ठ- क्रमांक, मूळ फोटोकॉपीड आवृत्तीतील वा संगणकावर उपलब्ध असलेल्या आवृत्तीतील शब्दांच्या पृष्ठ क्रमांकांशी जुळत नाहीत. असे असले तरी या कोशातही २२७ व्या पानावर देवनागरीत आणि रोमन लिपीत दोन्ही प्रकारे आर्ग्वैदिक (Aarg vai dika) असेच छापले आहे.
आता एकच मार्ग शिल्लक उरतो, तो म्हणजे कात्यायनाचा मूळ ग्रंथ मिळविणे. संस्कृतडॉक्युमेन्ट्स डॉट ऑर्ग या संकेतस्थळावर त्या ग्रंथाचा उल्लेख आहे, पण तेथे तो स्कॅन्ड स्वरूपात उपलब्ध नाही. पुण्याच्या वैदिक संशोधन मंडळाकडे विचारणा करायला हवी. (तिथल्या आवृत्तीतही कदाचित मुद्रणदोष असणार!) ...अद्वैतुल्लाखान