अक्षरे कमी करण्यासाठी सूचना उपरोधिक पद्धतीने केली असली तरी पुढील पिढी अशी मागणी गांभीर्याने करील अशी मला भीती वाटते. आपल्याला वेळ नाही म्हणून नियमच बदलण्याची मागणी होण्याआधी मी दोन मुद्दे मांडतो.

१) शासनमान्य शुद्धलेखनाचे नियम १.३ व १.४ प्रमाणे मराठी शब्द शीर्षबिंदू (अनुस्वार) देऊनच लिहावेत. उदाहरणार्थ: 'दंगा, झांज, बंड, खंत, संप' हे शब्द 'दङ्गा, झाञ्ज, बण्ड, खन्त, सम्प' असे लिहू नयेत. कारण "चिता" आणि "चिंता" यामध्ये जसा फरक आहे तसा खालील शब्दांमध्ये आहे.
वेदांत=वेदांमध्ये, वेदान्त= तत्वज्ञान,
देहांत=शरीरांमध्ये, देहान्त= मृत्यू.

२) तांत्रिक अंगाने पाहिले तरी देखील सर्व शब्द एकाच पद्धतीने (शक्यतो शुद्ध) लिहिणे महत्त्वाचे ठरते. उदाहरण म्हणून संत आणि सन्त हे दोन्ही शब्द गुगलमध्ये शोधून पहा. अगदी वेगवेगळे रिझल्ट मिळतील. का? संत शब्दाची फोड "स + अनुस्वार + त" आणि सन्तची "स + न + अर्धा पाय + त" अशी होते. आपल्याला काही फरक पडला नाही तरी संगणकाला पडतो बरं का!