मोल्सवर्थ कॅन्डीच्या कोशाइतके चांगले मराठी-इंग्रजी आणि इंग्रजी-मराठी कोश झालेच नाहीत. रानडे यांचे इंग्रजी -मराठी कोश बरे आहेत. दाते-कर्वेंचा अठरा खंडी मराठी-मराठी कोश आहे, पण तो आता दुर्मीळ आणि थोडाफार कालबाह्य झाला आहे. सोहनी यांचाही पाचखंडी कोश आहे, पण त्यात इंग्रजी शब्दांचा भरणा आहे. महाराष्ट्र शासनाने नुकताच प्रसिद्ध केलेला अनेक-खंडी मराठी-मराठी कोश आहे. तो आंतरजालावर देखील बहुधा, मराठी विश्वकोशमंडळाच्या संकेतस्थळावर सापडावा. या शब्दकोशाचे कार्यालय पुण्यात भारत इतिहास संशोधन मंडळाच्या इमारतीत पाठीमागे वरच्या मजल्यावर आहे. सध्या कोशाच्या पुरवणी खंडाचे काम चालू आहे. कोशाचे संपादक प्राचार्य रामदास डांगे आहेत.
व्युत्पत्तीसकट शब्दांचा अर्थ देणारा मराठी-मराठी कोश अस्तित्वात नाही. व्युत्पत्ती कोश आहे, पण वर म्हटल्याप्रमाणे तो तितकासा चांगला नाही. भाटवडेकरांचा आणि आणखी एका लेखकाचा असे दोन मराठी पर्यायवाची शब्द देणारे कोश आहेत.
महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेले कानडी-मराठी, गुजराथी-मराठी, तामीळ-मराठी कोश सरकारी प्रकाशने विकणाऱ्या केंद्रांत मिळतात. उर्दू-मराठी कोशांत म. तु. कुलकर्णी यांनी लिहिलेला एक अतिशय छोटा शब्दकोश आहे, पण तो मिळणे दुरापास्त आहे. दाते यांचा हिंदी -मराठी कोश आहे, त्यात उर्दू शब्द मिळतात. व्यं. न, कुलकर्णी आणि अविनाश बिनीवाले यांनी लिहिलेले जर्मन -मराठी कोश आहेत. .