गेले काही दिवस कार्यबाहुल्या (!! ) मुळे वरील प्रतिसादांची वेळेवर पोच देता आली नाही याबद्दल क्षमस्व.
वरील सर्व प्रतिसादांमधून बरीच उपयुक्त माहिती मिळाली. शुद्ध मराठी आणि लतापुष्पा यांनी दिलेल्या विस्तृत प्रतिसादांबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.
शासकीय शब्दकोशाचा शु.मं. नी वर दिलेला दुवा 'Under maintenance' आहे हे पाहून अपेक्षापूर्तीचा आनंद वाटला. सरकारी कार्यालय असो की वेब साइट, त्यातून पाहीजे ती माहिती पाहीजे तेव्हा मिळेल तो सुदिन.
असो, एक प्रश्न आहे - लतापुष्पांनी वर उल्लेख केलेला साहित्य महामंडळाचा कोश आणि शुद्ध मराठींनी उल्लेखलेला शासकीय कोश, हे एकच आहेत की वेगवेगळे? 'शासकीय' या नावापेक्षा 'साहित्य महामंडळ' हे थोडे जास्त विश्वासार्ह वाटते. शिवाय एवढ्या वर्षांनंतरही शासनाचे फक्त दोनच खंड झाले असतील, तर बाकीचे कधी पूर्ण होणार, हादेखील प्रश्नच आहे. तरी हा खुलासा करावा, आणि उपलब्ध असल्यास दुवे पुरवावेत.
पण अनेकखंडी शब्दकोश हे सर्वसामान्य वाचक/अभ्यासकाच्या दृष्टीने तसे गैरसोयीचेच आहेत. अर्थात, हल्ली सर्व खंड एकत्रितपणे इंटरनेटवर उपलब्ध होणार असतील, तर गोष्ट वेगळी. पण तरीही एखादा विस्तृत एकखंडी कोश हा सर्वसाधारण उपयोगाच्य दृष्टीने नक्कीच जास्त सोयीचा आहे. असा कोश लोकांना संदर्भासाठी घरीदेखील ठेवता येतो, त्यासाठी लगेच ग्रंथालयाकडे धाव घेण्याची गरज नाही. इंग्रजीतील 'Oxford Concise' हे अशा कोशाचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.
वर उल्लेखलेला सत्त्वशीला सामंत यांचा 'व्यवहारकोश' इंटरेस्टिंग वाटतो. हा कधी ऐकण्या-पहाण्यात आला नव्हता. पण हा कोश वर्णानुक्रमे नाही असे दिसते, त्यामुले शब्दकोश म्हणून त्याची उपयुक्तता बरीच कमी होते. विशिष्ट अभ्यासकांसाठी तो कदाचीत जास्त उपयोगी ठरू शकेल. तसेच भाटवडेकर/इतरांच्या पर्यायवाचक शब्दकोषाविषयीदेखील ऐकले नव्हते. हे सर्व कोश कधी प्रदर्शनात नजरेस पडलेले नाहीत. शक्य झाल्यास या सर्वांबद्दल प्रकाशक इत्यादी माहिती पुरवावी.
तसेच लतापुष्पांनी उल्लेख केलेला संस्कृत-इंग्रजी-मराठी- .. इत्यादी शब्दकोशदेखील इंटरेस्टिंग आणि संग्रही ठेवण्यासाठी उपयुक्त वाटतो. क्रुपया याचा तपशील द्यावा ही विनंती.
कृपाकुं च्या व्युत्पत्ती कोशाची सुधारित आवृत्ती मी लोकमान्य सेवा संघात (पार्ले) पाहीली आहे. पण मला हा कोश अपुरा वाटला कारण त्यात उदा., व्युत्पत्तीमध्ये दिलेल्या संस्कृत शब्दांचे मूळ अर्थ, ज्या अनुषंगाने तो शब्द विकसित (डिराइव्ह) झाला आहे, तो दिलेला नाही. या कोशाचा प्रिव्ह्यू बुकगंगावर उपलब्ध आहे.
पुन्हा एकदा, सर्व माहितीसाठी धन्यवाद, आणि या विषयावर पुढेही जेव्हा कधी कोणाला काही अधिक/नवीन माहिती मिळेल, तेव्हा ती अवश्य कळवत राहावी.