या चर्चेतील 'मराठीसाठी' म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे? मराठी भाषेसाठी, की नराठी संस्कृतीसाठी की 'मराठी माणुस' साठी ? वेगवेगळ्या लोकांनी या प्रश्नाला बेगवेगळ्या प्रकारे उत्तरे दिली आहेत. कोणी कोणी तर मी मराठी लोकांना नोकरीला लावले, वगैरे लिहिले आहे. तर कोणी कोणी परभाषिकांसमोर किंवा 'त्यांच्या नाकावर टिच्चून' काय केलं हे लिहिलं आहे. हे मराठीसाठी काही करणे झाले  का? 

मूळात मराठीसाठी मुद्दाम काही करण्याची, आणि मी ते करतो असं आवेशाने सांगण्याची गरज आहे का?  

पण माझ्या मते काही करायचच असेल, तर या गोष्टी करायला हव्यात - 

१) मुलांना मराठी शिकवा, त्यांना मराठी संस्कृतीची ओळख जाणीवपूर्वक करून द्या. जाणीवपूर्वक असं म्हणन्याचं कारण असं, की हल्लीचं वातावरण !! आज काल बहुतेक मुलांना इंग्रजी माध्यमात घातल जात. ते तसं करू नये असं म्हणणं आज कठीण आहे. पण त्यामुळे मुलं बहुभाषिक संस्कृतीला सामोरी जातात. टीव्ही, सिनेमा इत्यादी माध्यमातून देखील वेगळच जग दिसतं. त्यामुळे मराठी भाषा, आणि त्याहूनही जास्त मराठी संस्कृती यांच्याशी नैसर्गिक रित्या त्यांचा संबंध कमी येतो किंवा जवळपास येतच नाही. त्यामुळे आज हे 'मराठी शिक्षण' घरगुती पातळीवर मुद्दाम जाणीवपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. शेवटी भाषा जर जगायला आणि तगायला हवी असेल, तर ती नवीन पिढीच्या सुद्धा वापरात रहायला हवी. नाहीतर जुन्या पिढीबरोबरच भाषादेखील हळुहळू अस्तंगत होणारच. पण अलिकडे मुलं ज्या प्रकारच मराठी बोलतात, ते ऐकून त्यापेक्षा ते इंग्रजी किंवा हिंदीत बोलले तर जास्त बरं असं वाटू लागतं. अगदी मराठी माध्यमातील मुलही धेडगुजरी, म्हणजेच सरमिसळ भाषा बोलतात. त्यासाठी पालकांनी वेळोवेळी, आणि लहानपणापासूनच चुका सुधारल्या पाहिजेत, मार्गदर्शन केलं पाहीजे. त्याउलट बऱ्याचदा पालकच मुलांशी 'त्यांच्या' भाषेत बोलताना आढळतात. बऱ्याचदा तर मी असही पाहीलं आहे की मुल पालकाशी मराठीतून बोलत असत, पण पालकच मुलाशी अट्टाहासाने इंग्रजीतून बोलत असतात. याला काय म्हणायच? ही मराठीचीच नाही तर, देशातील इतरही अनेक भाषांची थोड्याफार फरकाने हीच स्थिती आहे, आणि यासाठी जाणीवपूर्वक, आणि तातडीने प्रयत्न न झाल्यास, परिस्थिती झपाट्याने आणखीनच बिघडत जाईल यात शंका नाही. 

२) दुसरा एक पूर्ण वेगळा मुद्दा असा की एक परीने प्रत्येकाने, आपापल्या पातळीवर, इतर भाषिकांबरोबर वावरताना स्वतः मराठीचा ब्रॅण्ड ऍंबेसेडर होणे. माझ्या मते आज मराठीची - म्हणजे सर्वसाधारण मराठी भाषिकाची 'इमेज' दुर्दौवाने देशात तेवढीशी चांगली नाही. मराठी माणूस म्हाणजे उर्मट, 'रफ', भांडखोर अशी प्रतिमा बऱ्याच, बिशेषतः उत्तर भारतीय लोकांमध्ये आहे. इतरांच सोडा, मला स्वतःला देखील बऱ्याचदा असच वाटतं. विशेषतः मराठी दुकानदारासंबंधात हा अनुभव प्रकर्षाने येतो. त्यातच राजकारण्यांनी महाराष्ट्राची आणखीनच वाइट प्रतिमा करून ठेवली आहे. त्यामुळे मराठी माणूस राष्ट्रीय बातमीपत्रात असलाच तर तो बहुतांशी याला मारा, त्याला झोडा, त्यांना हाकला, खळ् आणि फटॅक याच कारणांमुळेच जास्त असतो. तर, ही प्रतिमा बदलायची असेल, तर ते आपल्यावरच अवलंबून आहे. आपल्या भाषेवर प्रेम असणं छान, त्याचा अभिमान असणही ठीक, पण दुराभिमान नको.  इतर भाषिकांचा राग किंवा दुःस्वास नको. बऱ्याचदा या अतिरेकी अभिमानामधून, अभिमानापेक्षा जास्त, स्वतः विषयीचा एक प्रकारचा गंड, किंवा कॉम्प्लेक्सच आपण जास्त दाखवतो असं मला वाटतं. असा कॉम्प्लेक्स असण्याच काहीच कारण नाही, आणि इतरांविषयी देखील एक 'हेल्दी रिस्पेक्ट' आपण ठेवायलाही काहीच हरकत नाही. आपण सर्व भाषांना त्यांचा त्यांचा योग्य तो मान द्यावा, आपल्या भाषेलाही तो आपोआप मिळेलच. 

३) हल्ली टीव्ही आणि अगदी  वर्तमानपत्रातूनसुद्धा  मराठीचा दर्जा भयंकर घसरत चालला आहे. एकच उदाहरण - 'एखाद्याची' मदत करणे' हा वाक्प्रयोग हल्ली एवढा रुढ झाला आहे, की अलिकडे तो कोणाच्या काना-डोळ्याला खटकत देखील नाही. पण मराठीत अगदी हल्लीपर्यंत कोणाची नव्हे तर कोणाला मदत केली जात असे. पण टीव्हीने 'किसिकी मदत करना' या हिंदीचं थेट भाषांतर मराठीत आणलं, आणि रुढ केलं. हे केवळ एकच उदाहरण आहे, पण अशी अगणित उदाहरणं रोज ऐकण्या-वाचण्यात येत असतात, पण याबद्दल कोणीच काहीच बोलताना आढळत नाही. आधीच म्हटल्याप्रमाणे तरुण पिढीच मराठी आधीच दिव्य आहे,  त्यातून सतत असं चुकीचं मराठी कानावर पडत राहीलं, तर काय होणार? तर, या संबंधात अशा प्रकारच्या चुका आपण शक्य तेवढ्या आणि शक्य तेथे संबंधितांच्या तसेच सर्व समाजाच्या निदर्शनास आणल्या पाहीजेत, आणि त्या सुधाराव्यात असा (नम्र) आग्रह धरला पाहीजे (नम्र हे मुद्दाम सांगाव लागत, नाहीतर यावरून पुन्हा राडावाले लोकं सुरू होतील). आपण जर असंच मुकाट राहून चुकीच मराठी ऍक्सेप्ट करत राहीलो, तर मराठीच असच अधिकाधिक 'हिंदीकरण' चालूच राहील.