कै. विद्याधर वामन भिडे यांच्या पुस्तकावरून :--

मातीचे कुल्ले -
नात्याचा संबंध नसता, ज्यावर आपण नातलगाप्रमाणे प्रेम करावे तसे करत असतो. परंतु अडचणीच्या वेळी जो आपल्या उपयोगाच्या वेळी उपयोगास येण्याचा संभव नसतो असा माणूस. वाक्यात उपयोग करायचा झाला तर विशेषतः नवराबायकोच्या भांडणात एकमेकांच्या सासरची माणसं किती कुचकामाची आहेत हे कुजकटपणे सांगण्यासाठी 'हो, काही झाले तरी मातीचे कुल्ले, लावल्याने लागत नाहीत म्हटले!' असे म्हणता येते.

राम -
१. सामर्थ्य शक्ती जोर. उदा. त्या उपरण्यात आता राम उरला नाही.
२. राम म्हणजे रुपया, सीताबाई म्हणजे अधेली. राम हा पुल्लिंगी शब्द आहे एवढ्या कारणाने भिक्षुकांमध्ये राम म्हणजे रुपया, आणि त्याचे अर्धांग, स्त्रीलिंगी म्हणून अधेली.

स्मशानवैराग्य - क्षणिक वैराग्य.
स्मशानात गेल्यावर जे काही काळच मनाला वैराग्य वाटते ते.
स्मशानासारख्या ठिकाणी 'साऱ्या ऐहिक गोष्टी व्यर्थ आहेत, सर्वांनाच कधीतरी जायचे आहे' इत्यादी भावना मनात बळावतात. परंतु घरी परत गेल्यावर त्याच सर्व ऐहिक गोष्टी स्वर्गमोलाच्या वाटू लागतात. एखाद्या समाजसेवकाचे भाषण ऐकून भारावून जाऊन देशसेवेला तनमनधन वाहून घेण्याची भावना होते. पण ती तेवढ्यापुरतीच. भाषण संपवून घरी जातेवेळी बसचे तिकीट न काढताही तिकीट तपासनिसाच्या तावडीत न सापडण्याचा आनंद होतो. आणि मघा उद्भवलेली समाजाला सर्वस्व अर्पण्याची ऊर्मी कोठल्या कोठे निघून जाते. हे स्मशानवैराग्य. याच्याच जवळचा आणखीन एक शब्दप्रयोग म्हणजे आतुरसंन्यास.

आतुरसंन्यास -
आपला मरणकाळ जवळ आला आहे अशी मनाची खात्री झाल्यावर जो सन्यास घेतात तो.
म्हणजे संपूर्ण आयुष्य, बऱ्यावाईटाचा विधिनिषेध न बाळगता यथेच्छ उपभोगून झाले. मृत्यूसमय जवळ येता परलोकातील भवितव्याची चिंता वाटू लागली. तेव्हा मरण्यापूर्वी सन्यास घेऊन इहलोकात कीर्ती आणि परलोकात थोडेफार पुण्य हे दोन्ही साधावे या अत्यंत व्यवहारी दृष्टि‌‌कोनातून घेतलेला संन्यास. त्यात ना वैराग्य, ना अध्यात्म.

शेंदाडशिपाई -
शेंदाडे हे फळ (खरबूज किंवा तत्सम) पातळ त्वचा व मऊ गर असलेले असते. जराशा धक्क्याने ते फुटते. शेंदाडासारखा शिपाई म्हणजे ज्याला रट्टे खाण्याची ताकद नाही असा. यामुळे या शब्दाचा अर्थ पुढे भित्रा माणूस असा झाला.

सहा महिन्यांची जांभई - लवकर सिद्धीला न जाणारे काम.
कुंभकर्ण सहा महिने झोपत असे त्याच्या जांभईवरून हा वाक्प्रचार आला असावा.

चार खुंट जहागीर - चार खुंट म्हणजे पृथ्वीचे चार कोपरे. या कोपऱ्यांपर्यंत पसरलेली जहागीर.
परंतु येथे अर्थ वेगळा आहे. भिक्षेकऱ्याची चौकोनी फडक्याची झोळी जमिनीवर पसरली की त्याचे कोपरे चार दिशांकडे असतात. या फडक्याचा विस्तार म्हणजेच चार खुटांची जहागीर.
थोडक्यात, अत्यंत दरिद्री अवस्था.

घड्याळ टिपरू - मिरची भाकर असे गरीबाऊ जेवण.
पातळ वाटोळी भाकर म्हणजे तास आणि मिरची म्हणजे तिच्यावर बडवण्याचे टिपरू. फक्त भाकर आणि तिच्याबरोबर चवीसाठी मिरची असलेलं जेवण.

नागवे कोल्हे - अकल्पित लाभ
कोल्हे हे क्वचितच एखाद्यास दृष्टीस पडणारे जनावर. त्यामुळे त्यावरून हा वाक्प्रचार आला असावा.

पाप्याचे पितर - अतिशय रोड माणूस
हा अर्थ सर्वांना माहीत असतो. त्याची व्युत्पत्ती :  पापी लोक श्राद्धादी कर्मे करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या पितरांना खावयास न मिळून ती कायम रोड असतात.

प्रथम वंदे - हलकट नीच माणूस
उदाहरणार्थ, 'अरे तो गोविंदराव प्रथम वंदे  आहे  बरं का. त्याच्याशी जपून वाग.'

दुर्जनांना सर्वसामान्य घाबरून असतात. त्यामुळे काही झाले तरी त्यांना आधी वंदन करून मोकळे व्हावे, आणि पीडा टाळावी.

शुक्लकाष्ठ - लचांड, झेंगट
एका स्त्रीने आपल्या कुटुंबातली खरी पण लाजिरवाणी गोष्ट कोणा इसमास सांगितली. ती लाजिरवाणी गोष्ट तू परक्याला का सांगितलीस म्हणून पती तिला सुकलेल्या लाकडाने झोडपू लागला. त्यावर ती म्हणाली "बोलायला गेले सुपाष्ट (स्पष्ट) अन् पाठीत बसलं सुकलं काष्ठ"

आकाशपाणी - मद्य (ताडी किंवा माडी)
ताड व माड ही झाडे उंच असतात. आणि त्यापासून निघणारी पेये, त्यांच्या माथ्याजवळ म्हणजे जमिनीपासून फार उंचावर, जणू काय आकाशात असतात. यावरून ताडी व माडी यांना आकाशपाणी म्हणण्यात येते. कदाचित जे पाणी प्याल्याने मनुष्य जणू काही आकाशात विहरू लागतो, ते पाणी, अर्थात दारू.