हा विषय जरा अवघड आहे - प्रतिक्रिया द्यायला. कोणते लिखाण हे योग्य किंवा अयोग्य, आणि याचे निकष कसे लावयचे? साहित्य कशाला म्हणता येईल आणि नुसतेच विकृत लिखाण कोणते? ना. सी. फडक्यांसारख्या मान्यवर साहित्यिकाने अगदी चाळवण्यासारखी, आणि उत्तान वर्णने केलेली आहेत असे ऐकले आहे - मी स्वतः वाचलेले नाही. खांडेकर, श्री. ना. पेंडसे यांच्या नावावर देखील अशी पानच्या पानं जमा आहेत. इतरही अनेक लेखक असतील, आत्ता आठवत नाही. भाऊ पाध्ये (वासुनाका), उद्धव षेळके यांची पुस्तके त्या त्या काळात प्रचंड गदारोळात सापडली होती. तरी हा सर्व ३० ते ७५ वर्षांपूर्वीचा (१९४०-१९८५) काळ आहे, आणि तो काळ आजच्या मानाने किती 'मागासलेला' होता, याची इथल्या बहुतेकांना कल्पना असेलच. तरीही हे सर्व साहित्य मिटक्या मारीत वाचणारे सुसंस्कृत शौकीन त्या काळातही होतेच, कदाचीत आजच्या मानाने जास्तच असतील. (कारण ते सर्व मसालेदार साहित्य आज कदाचीत थोडंफार अळणी वाटेल!! )
बरं हे सर्व बडे लेखक, आणि एवढा एक वादाचा मुद्दा सोडला, तर हे सर्व निःसंशय उच्च कोटीच साहित्य म्ह्णून सोडून देऊ. पण एवढच काही नव्हतं. उदाहरणादाखल, चाळीस एक वर्षांपूर्वीपासून (कदाचीत आधीही असेल) मेनका नावाचं एक तुफान लोकप्रिय मासिक प्रकाशित होत असे. आजही होतं बहुधा, पण आधीच म्हटल्याप्रमाने आता ते फारच अळणी झालं असावं. असो. तर या मासिकाचा उद्देश आणि त्यात प्रकाशित होणारे साहित्य, हे काय प्रकारचे होते हे बहुतेकांना आठवतच असेल. आणि त्या काळातील पांढरपेशे, मध्यमवयीन पुरुषच नव्हे तर स्त्रिया देखील हे मासिक आवडीने, बिनदिक्कत आणि उघडपणे वाचत असत. पण या साहित्याचा हेतू अगदी स्पष्टपणे भावना चाळवण्याचा, किंवा खर तर उद्दीपित करण्याचाच होता, आणि त्यात काही लपवाछपवी देखील नव्हती. पण त्याला कोणी विकृत असं कधी म्हटल्याच माहितीत नाही. यात बाऱ्याचदा येणाऱ्या आनंदध्वजाच्या कथांचं संकलन पुस्तकरूपाने देखील प्रकशित झाल आहे.
तर, वरील जी 'सायबर कॅफे' गोष्ट आहे, तिच किंवा अशा प्रकाराचं मी समर्थन करतो आहे असशातला भाग नाही, विरोध करतो आहे असही नाही. सांगण्याचा मुद्दा एवढाच, की पूर्वीदेखील आणि कदाचीत प्राचीन काळापासून (संस्कृत नाटककार वगैरे) , प्रतिष्ठित आणि उच्चभ्रू अशा लेखक आणि प्रकाशनांनी विवादास्पद म्हणता येऊ शकेल अशा प्रकारचं लिखाण प्रकाशित केल आहे. तर, साहित्य नेमकं कशाला म्हणायचं आणि छचोर लिखाण कोणतं, विकृती कोणती आणि नैसर्गिक काय, आणि शेवटी कुठलं लिखाण ऍक्सेप्टेबल आणि कुठलं डिप्लोरेबल, हे प्रश्न तेवढेसे सहज सोपे नाहीत एवढच म्हणायचं आहे. इतर वाचकांच्या यावर प्रतिक्रिया वाचायला आवडतील.