"शृंगार - अश्लीलता यामधली सीमारेषा धूसर आहे. त्यामुळे फडके - पाध्येच काय अगदी काकोडकर - दळवींचे (पेंडश्यांच्या "रथचक्र" मधील काही पाने) लेखन विकृत म्हणता येणार नाही. "
खरं आहे. पण उदा. - श्री. नां. च्या १९७९ च्या आसपास लिहिलेल्या 'ऑक्टोपस' मध्ये पुरुष समलिंगी संबंध दर्शवले आहेत. (तुम्ही वेगळ्या कादंबरीचा उल्लेख केला आहे, त्या विषयी माहीत नाही.) तुम्ही म्हटल्याप्रमाणे कादंबरीत जरी 'ग्राफिक चित्रण' नसले, तरी असे संबंध हे निदान त्या काळात तरी विकृतीच समजले जात, अगदी सर्वात 'लिबरल' अशा अमेरिकेत सुद्धा. तेव्हा त्या दृष्टीने जरी ते विकृत लिखाण नसेल, तरी 'विकृत' व्यक्तिरेखेविषयी होतेच. तुलना करायची झाल्यास इथली सायबर कॅफे ची गोष्ट देखील विकृत व्यक्तिरेखेविषयी आहे, ते विकृत लिखाण नाही, असा युक्तिवाद यशस्वीपणे करता येईल.
यापुढे जाऊन, १९८५च्या आसपास प्रकाशित पेंडशांच्याच 'तुंबाडचे खोत' मध्ये तर नक्कीच विकृतीचा आरोप होऊ शकेल अशी बीभत्स वर्णने आहेत. जयवंत दळवींच्या बऱ्याच साहित्यकृतींमध्येही विकृती / विकृत पात्रांना महत्त्वाचे स्थान आहे. किंवबहुना त्यांच्या बऱ्याच साहित्यकृती विकृतीभोवतींच गुंफलेल्या आहेत. दळवींनी हे स्वतःच मान्य केले होते, आणि त्याचे समर्थनही केले होते, कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बालपणापासून त्याच्या पाहण्यात अशा व्यक्ती, आणि अशा वृत्ती पुष्कळच आल्या, त्यामुळे आपोआपच त्याचेच चित्रण त्यांच्या वाङ्मयात जास्त आले आहे.
आता ही वरील गोष्ट दळवी किंवा पेंडशांच्या पातळीची आहे असं अजिबात म्हणायचा उद्देश नाही. पण ज्या मुद्द्यावरून या कथेवर आक्षेप घेतला गेला आहे, तसा इतरांबाबतही घेता येऊ शकेल. माझ्या मते ही गोष्ट साहित्य म्हणून हलकी (इनफिरिअर) असेलच - आणि तशी ती आहेच - तर ती कदाचित या कारणामुळे की या कथेत ज्याला 'साहित्यिक मूल्य' म्हणता येऊ शकेल असं काही नाही.