आपल्याला नेहेमी, विशेषतः लहानपणी, सांगीतल जातं, की चांगलं वागलास तर नेहेमी चांगलं होतं, वाईटाच नेहेमी वाईट होत. खर वागणाऱ्या, सद्वर्तनी लोकांचं (शेवटी ?) भलंच होत, तर दुर्वर्तनी, खोट्या माणसाला त्याचं फळ कधी ना कधी भोगावच लागत. पापी मणसाला त्याच्या पापांचा हिशेब याच आयुष्यात द्यावा लागतो... वगैरे वगैरे, आणि असच बरच काही. सर्वाचा साधारण मतितार्थ एकच - चांगल्याचं नेहेमी चांगलं होत, आणि वाईटाच वाइट. पण सांगणाऱ्यालाही बहुतेक वेळा माहीत असतं, की हे सगळं काही खर नाही. प्रत्यक्ष आयुष्यात असं काही होत नाही. बऱ्याचदा चांगली, सद्वर्तनी माणसच खड्ड्यात जातात, आणि लबाड, धूर्त लोक आयुष्यभर मजेत राहतात. थोडक्यात ही जी 'शिकवण' आपल्याला सांगीतली जाते, ती पुष्कळच आदर्शवादी असते. तसं व्हावं असं सगळ्यांनाच वाटतं, पण प्रत्यक्ष आयुष्यात असा न्याय अपवादानेच होतो. पण क्वचित प्रसंगी जेव्हा खरोखरच असा न्याय घडतो, विशेषतः असं होतं की एखाद्याची दुष्कर्मं पचून जातात, त्याची लबाडी खपून जाते, पण कुठल्यातरी संपूर्ण वेगळ्याच प्रकारे त्याच नुकसान होत, त्याला त्याची किंमत वेगळ्या प्रकारे चुकवावी लागते. अशा वेळी कधी कधी याला पोएटिक जस्टीस किंवा काव्यात्मक न्याय झाला अस म्हणतात.
उदाहरण म्हणून -
काही वर्षांपूर्वी टीव्हीवर एका सांगितिक रिऍलिटी शो मधील हा प्रसंग. या शो मधील स्पर्धक हे सर्व मातब्बर आधीच्या स्पर्धा गाजवलेले स्पर्धक होते, आणि त्यांना त्या दृष्टीने संगिताची जाण होती. त्यामुळे प्रत्येक स्पर्धकाच्या गाण्यानंतर त्याचे मूल्यमापन करताना इतर स्पर्धकही त्या गाण्याला गुण देत. त्या शिवाय परीक्षक तर होतेच. आणि या सर्वांचे गुण एकत्र करून शेवटी कोणाला बाद करायचे याचा निर्णय होत असे. अर्थात स्पर्धक एकमेकांना मार्क्स देत असल्यामुळे हेवे दावे यानुसार एखाद्याला मुद्दाम कमी मार्क देणे वगैरे 'सोय' होती.
तर एक दिवशी (म्हणे) एका स्पर्धिकेला बऱ्याच स्पर्धकांनी ठरवून, कपटाने कमी गुण दिले - तिचं गाणं चांगलं झालेलं असूनही, आणि त्यामुळे तिचे एकूण गुण खुपच कमी होऊन ती बाहेर फेकली गेली. एका विशिःट स्पर्धिकेने या 'मॅच फिक्सिंग' मध्ये पुढाकार घेऊन हे सर्व घडवून आणलं अशी चर्चा सर्वत्र झाली. आता योगायोगाने याच्या पुढच्याच फेरीमध्ये असं झालं की ही जी कपट-प्रमुख स्पर्धिका होती, तिच गाण त्या फेरीत झूपच खराब झालं. त्यामुळे अर्थातच तिला सर्वात कमी गुण मिळाले, आणि या वेळी तीच स्पर्धेतून बाद झाली. म्हणजे ती खरं तर बरीच चांगली गायिका होती, पण योगायोगच असा, की तिच गाणं तिच्या नेहेमीच्या दर्जाहून खूप वाईट झालं. या वेळी प्रतिक्रीया देताना, एका जजने असे उद्गार काढले, की हा एक प्रकारे पोएटिक जस्टिस झाला. कारण तर्कसंगती प्रमाणे तिच्या कपट कारस्थानाचा, आणि लागोलाग तिच्या वाइट गाण्याचा तसा काहीच सबंध नव्हता. पाण योगायोगाने, आणि तडकाफडकी असा जो न्याय या वेळी झाला, तोच पोएटिक जस्टिस. हा असा न्याय बहुधा कल्पना विलासात, किंवा कथा कवितेतच घडत असतो, आणि म्हणूनच हा 'काव्यगत' न्याय.