'रुड'ने अंत होणारा गरुड हा एकच मराठी शब्द असावा, आणि तोही मूळ संस्कृत आहे म्हणून. अ-संस्कृत मराठी शब्दांत येणाऱ्या 'रूड'मधला 'रू' नेहमी दीर्घ असतो. उदा० बुरूड, गारूड, कुसरूड, भेरूड, मुरूड, नखरूड, मिसरूड, म्हसरूड (म्हैसरूड) , खत्रूड वगैरे. त्यामुळे कोथरूडमधला 'रू' बहुधा दीर्घ हवा.
मराठी शब्दात येणारे सर्व उपांत्यपूर्व इकार-उकार ऱ्हस्व असतात. (जोडशब्द अपवाद! ) ज्याप्रमाणे गढूळपासून गढुळले होते, तसेच भेरुडणे, मुरुडणे असे नामधातू बनत असतील तर त्यांच्यातला 'रु' नक्की ऱ्हस्व असणार.
जोडशब्दांतले उपांत्यपूर्व इकार-उकार ऱ्हस्व नसू शकतात. उदा० आईबाप, मीठभाकर, तूपसाखर, रीतभात, गूळपीठ, गूळपापडी, मुरूडशेंग, वगैरे.