वाचकाला/ प्रेक्षकाला अस्वस्थ करणे / विचार करायला लावणे हे कलाकृतीचे यश समजण्याचा एक काळ होता. होता म्हणण्याचे कारण असे की 'हंड्रेड क्रोर क्लब' हा एकच निकष लावून चित्रपटाचे यशापयश मोजले जाण्याच्या जमान्यात हा विचार कालबाह्य वाटू शकतो. अल्झायमर्स डिसीज या विषयावरचा 'धूसर' नावाचा चित्रपट बघून माती खाल्ली असल्याने, तथापि भावे-सुखटणकर जोडीचा चित्रपट असल्याने 'अस्तु' ला गेलो. नकारात्मकच लिहायचे तर संकलक मोहित टाकळकराची कात्री अजून थोडी धारदार व्हायला हवी होती. काही प्रसंगांत चित्रपटाची गती मंदावते, तो रेंगाळतो. संवाद अगदी 'समांतर' इतके कृत्रीम नसले तरी बर्‍यापैकी पुस्तकी वाटतात. इंग्रजी धर्तीचे मराठी बोलणार्‍या मिलिंद सोमणला का घेतले (आणि त्या जागी अतुल कुलकर्णीला का घेतले नाही) आणि देविका दफ्तरदारला इतकी नगण्य भूमिका देऊन वाया का घालवले हे आणखी काही नकारात्मक प्रश्न. सकारात्मक लिहिण्यासारखे बरेच आहे. मोहन आगाशेंच्या अभिनयाबद्दल बरेच लिहिले गेले आहे. आणि तो तसा अप्रतिम आहेच. (त्यांच्या धारदार नजरेत कधीकधी 'नाना' डोकावतो हा त्या संचातला प्रयोग बघीतल्याचा दुष्परिणाम असावा!) बाकी अल्झायमर्सने त्रस्त असलेले लोक विस्मरणाबरोबर 'मूड स्विंग्ज' चेही बळी असतात का यावर तज्ज्ञांनी प्रकाश टाकावा. पण अभिनयाच्या बाबतीत इरावती हर्षे नंबर एक. वडीलांबद्दलची काळजी, त्यांच्या दुखण्याने आलेला वैताग, त्या वैतागाची वाटणारी खंत हे सगळे इरावती हर्षेने अगदी नेमके साकारले आहे. ('देवराई' मधल्या सोनाली कुलकर्णीची आठवण यावी असे). अमृता सुभाषचाही उत्तम अभिनय.(अशा पद्धतीच्या मायाळू, जुनाट संस्कारांच्या, कुणीही वडील माणूस भेटला की त्याला वाकून नमस्कार करणार्‍या, कानडी बायका ज्यांनी बघीतल्या आहेत अशांना अमृताच्या अभिनयाचे कंगोरे अधिक नीट कळू शकतील.'आमचं ताई म्हणजे आमचं आईच आहे बघा' असे (सुनीता देशपांडेंबद्दल) बोलणारे मन्सूर आठवतात!). चित्रपटाच्या तांत्रिक बाजूही उत्तम. (बाकी पुण्यात चित्रपट बघण्याचा हा एक ताप असतो. चित्रीकरणाच्या परिचित जागा दिसल्या की पब्लीक 'ही पर्वती, हा लक्ष्मी रोड' असे चार रांगांना ऐकू येईल इतपत 'कुजबुजत' असते. रायटिंग, नॉट दी रायटर!) अमृताच्या तोंडची कानडी गाणी कानाला लई ग्वाड लागतात.एकूण एक समाधानकारक अनुभव.गेल्या कित्येक दिवसांत थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहिला नव्हता आणि हा उपास 'किक' किंवा 'लई भारी' ने सोडण्याची इच्छा नव्हती. त्या दरम्यानच हा चित्रपट लागला (पुण्यात फक्त दोन ठिकाणी - प्रत्येकी दिवसाला एक शो! 'किक' चे दिवसाला शंभर शोज तरी असतील. अस्तु.) हे (दाभोळकरांच्या भाषेत) 'नशीब न मानणार्‍याचे नशीब' अस्तु. अस्तु.