पुण्यात निदान 'अस्तु' चे दोन शोज तरी आहे, पण पहिल्याच आठवड्यात मुंबईत एक देखील नाही !!  आता एखाद्या मोडकळीला आलेल्या थिएटरमध्ये गुप्तपणे काही शोज लावले असल्यास माहीत नाही, पण निदान बूक-माय-शो किंवा इंटरनेटवर इतरत्र काही ठावठिकाणा सापडला नाही. 'नो शोज आर करण्टली ऍव्हेलेबल  हा संदेश बूक-माय-शो वर पाहून या चित्रपटाला नेमकी कधी मुक्ती  मिळाली याचा तपास केला, तेव्हा परवा एक ऑगस्टलाच हे घडल्याचे आढळून आले. अर्थात मुंबईत सर्वत्र लाथांचा सुकाळ (किक) यथास्थित चालू आहेच, आणि तरी मराठी सिनेमा पूर्णपणे हद्दपार झाला आहे असं अजिबात नाही. ३ आठवड्यांपूर्वीचा 'लय भारी' अजूनही आमच्या स्थानिक मराठीबहूल भागातील चित्रपटगृहात २ शोज टिकवून आहे, तर, याच सप्ताहात मुक्त झालेल्या 'पोष्टर बॉय्ज' ने एक शो यशस्वीपणे पटकावला आहे. 

खरं तर, मोहन आगाशे वगैरे नावं असूनही, हा  चित्रपट पाहावा अस मुळात काही अजिबात वाटलं नव्हत, पंण हा टीकालेख वाचून उत्सुकता निर्माण झाली आहे. पण मराठी सिनेमा एकूणच  हल्लीच्या  काळात कायम मनात एक शंका घेऊनच येत असतो. दोन-तीन वर्षांपूर्वी अतुल कुळकर्णीच्या नावाला भुलून  'नटरंग' हा मराठी सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहील्यापासून मराठी सिनेमांचा धसकाच घेतला होता.  त्यानंतरच्या काळात टीव्ही / यूट्यूब वर काही मोजके चांगले मराठी चित्रपट पाहण्यात आले, तरी थिएटरमध्ये मराठी सिनेमाच्या वाट्याला जायच नाही, ही खूणगाठ मनाशी पक्की होती. पण शेवटी याच आठवड्यात दिलीप प्रभावळकर / हृषिकेश जोशी इ. मातब्बर नावांना बळी पडून 'पोष्टर बॉय्ज' पहायला गेलो, आणि पुन्हा एकदा स्वतःच्याच बावळटपणाला स्वतःलाच हसण्याचा प्रसंग आला. थोडक्यात, नट-नट्यांच्या नावावर विसंबून चित्रपटाची परीक्षा करण्याचे दिवस नाहीत हेच खरे. तसही अमृता सुभाष विषयी वर व्यक्त केलेल्या मताशी मीही सहमत आहे. इतकच काय, डॉ. आगाशे यांचा अभिनयदेखील अलीकडे बराच पठडीतलाच वाटतो. पण या चित्रपटात कदाचित जास्त चांगले काही केले असेलही. सुमित्रा भावे हे नाव मात्र निश्चितच उत्सुकता निर्माण करणारे आहे. एकूण, फार खडतर प्रवास न करता जवळपास, कुठे पाहता आला, तर आणखी एकदा हा जुगार खेळण्याची तयारी आहे. पण तशी संधी मिळेल याची शक्यता धुसर वाटते !!