या लेखामुळे लहानपणीचा (सुमारे ६० वर्षांपूर्वीचा) एक प्रसंग आठवला. मी प्राथमिक शाळेत होतो. एकदा एका सणाच्या दिवशी माझ्या वर्गमित्राला "ब्राह्मण" म्हणून जेवायला बोलावलं होतं. त्याची मुंज झाल्याचं माहीत होतं म्हणून! तो सोवळं नेसून आमच्याबरोबर जेवायला बसला. त्या काळच्या रिवाजानुसार त्यानी अंगातला शर्ट काढला होता. माझ्या वडलांचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि त्याच्या गळ्यात जानवं नाही हे त्यांना दिसलं. त्यांनी त्याला काय रे तुझी मुंज झाल्ये ना असं विचारलं. त्यानी हो असं संगितल्यावर वडील त्याला म्हणाले, "मग जानवं कुठे आहे?" त्यावर तो म्हणाला, माझ्या वडलांनी सांगितलंय की जानवं हे यज्ञोपवीत आहे त्यामुळे ते फक्त यज्ञाच्या वेळीच घालायचं. इतरवेळी नाही. मित्राचे वडील आमच्या गावात विद्वान म्हणून प्रसिद्ध होते. माझे वडील क्षणभर गप्प झाले. पण नंतर त्याला म्हणाले, "अरे, आपण वदनी कवळ घेता हा श्लोक म्हणतो ना? त्याची शेवटची ओळ काय आहे? तर उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म. म्हणजे जेवणही एक प्रकारचा यज्ञच आहे. मग जेवताना जानवं घालायला पाह्यजे की नाही?" माझा मित्र दबलेल्या आवाजात हो म्हणाला. त्यानी आपल्या वडिलांना ही गोष्ट सांगितली की नाही कुणास ठाऊक. पण त्याचे वडील मुलांच्या बाबतीत अतिशय कडक होते. त्यामुळे ती शक्यता कमीच होती.