" आलेले अनुभव अगोदर माझ्या लक्षात थोडेच रहातात आणि ते रंगवून सांगण्याची हातोटी तर मुळीच नाही. " 
     अस तर काही वाटत नाही. तुम्ही तर छानच रंगवून सांगीतले आहेत तुमचे अनुभव !! 


थोडेसे विषयांतर करून (किंवा टँजंट मारून) - तुमच्या 'बीस  साल बाद' अनुभवावरून मला माझा एक अनुभव आठवला. 
     अनेक वर्षांपूर्वी कॉलेजात असताना, जवळच्या एका चित्रपटगृहात गेलो होतो ऍडव्हान्स बुकिंग करायला. (तेव्हा अनेक दिवस आधी बुकिंग करावं लागत असे !! ) चित्रपट असाच रहस्यमय होता, आणि उत्कृष्ट रहस्यपट म्हणून त्यावेळी फार नावाजला जात होता. सर्वसाधारण पब्लिक आणि समीक्षक दोन्हीक्डून अनुकूल अभिप्राय  मिळाले होते. चित्रपटाचे रहस्य जपून ठेवण्यात आले होते. त्यामुळे तो चित्रपट पाहण्याची प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती. तर, तिकीट काढण्यासाठी म्हणून मी ज्या वेळी चित्रपटगृहाच्या संकुलात शिरलो, त्याच वेळी नेमका चित्रपटाचा एक शो सुटला होता आणि लोकं बाहेर पडत होते. मी खिडकीकडे चाललो होतो, तेवढ्यात बाहेर जाणाऱ्या लोकांपैकी दोघे अगदी माझ्या बाजूने चालले होते, चित्रपटाने भारावून गेले होते बहुधा. आणि त्यातला एक जण दुसऱ्याला म्हणत होता - 'क्या सही पिक्चर था रे. एण्ड तक समझा नही ***** ***** ने खून किया. ' ( ***** ***** च्या जागी नटाचे नाव घेतले होते. ) हे वाक्य माझ्या कानावर पडलं, आणि मी जागच्या जागी थिजलो.... राग आणि निराशेने मन भरून गेलं. काय करावं सुचेना. त्या माणसाला आणि माझ्या नशिबाला मी मनातल्या मनात यच्चयावत शिव्या मोजल्या. पण आता काहीही केलं तरी त्याचा काही उपयोग नव्हता. फुटलेलं रहस्य आता परत पडद्याआड जाणार नव्हत. वेगाने निर्णय घेणं ही काही माझी खासियत तेव्हाही नव्हती. पण त्या वेळी मी तडकाफडकी निर्णय घेतला. आता हा चित्रपट पाहण्यात काही अर्थ नाही हे निष्ठुरपणे मनाला पटवलं, आणि गेलो होतो तसाच आल्या पावली परत फिरलो. त्यानंतर आजतागायत तो चित्रपट - त्याचं नाव होतं 'खामोश' - टीव्हीवर होऊन देखील पाहिलेला नाही. एवढच काय, कथेबद्दल - काय आहे, कशाबद्दल आहे वगैरे - पुसटशी कल्पनादेखील नाही. त्यामुळे आजतागायत मला त्या चित्रपटाबद्दल फक्त आणि फक्त एकच गोष्ट माहीत आहे, आणि ती म्हणजे, खून कोणी केला.