कितीही चांगला पर्याय असला, तरी स्वतःची टूर स्वतःच आखणे व्यावहारिक दृष्ट्या सर्वांनाच शक्य होईल असे नाही. त्या साठी बराच वेळ द्यावा लागतो, जो सर्वांकडे असेलच असे नाही. त्याशिवाय बरीच माहिती काढावी लागते, प्लॅनिंग करावे लागते, तसेच अनोळखी देशात अनपेक्षित अडचणी येऊ शकतात. तसेच इतर सर्व डोकेदुखी टाळण्यासाठी आणि सुट्टी पूर्णपणे एन्जॉय करावी म्हणून लोकं असा टूर कंपन्यांचा पर्याय निवडतात, तर डोकेदुखी कमी होण्याऐवजी वाढते आणि आगीतून फुफाट्यात पडल्याची अवस्था होते. 

यासाठी पॅकेज टूर हा मध्यम मार्ग सर्वात चांगला पर्याय ठरू शकतो. एसओटीसी(SOTC), थॉमस कुक सारख्या (इतरही असतील) कंपन्या टूर ऍरेंज करून देतात. म्हणजे तुमच्याकडे जेवढे दिवस आहेत त्यानुसार, तुमच्याशी चर्चा करून, तुमच्या आवडीनिवडी/गरजेनुसार जाण्यायेण्याची व्यवस्था (रिझर्वेशन इ.), रहाण्याची व्यवस्था, काय काय पाहावे, प्रवास कसा, कोणत्या मार्गाने करावा, विविध गावा-शहरांना कोणत्या क्रमाने भेट द्यावी इत्यादी सर्व प्लॅनिंग तुमच्याशी बोलून करून देतात. तसेच आवश्यक ती सर्व माहितीही पुरवतात. अर्थात तुमचा टूर  प्लॅनर जेवढा चांगला, तेवढं चांगलं प्लॅनिंग तो करू शकतो. (या सेवेसाठी अर्थात पैसेही मोजावे लागतात. ) अर्थात या पर्यायातही तुम्हाला कमीकमी, पण थोडी फार जबाबदारी स्वतःवर घ्यावीच लागते. एवढाही त्रास नको असेल तर मग टूर  कंपन्यांच्या मर्जीवर अवलंबून राहून मेंढरांप्रमाणे त्यांच्यापाठी धावणे एवढाच पर्याय उरतो. त्यामुळे  'नशिबावर हवाला ठेवणे' एवढेच तुमच्या हाती उरते !!