माझ्या मते पुस्तकाच्या पानांच्या चित्रांशी झटापट करत बसण्यापेक्षा एखादे आटोपशीर व्याकरणाचे पुस्तक दुकानातून विकत घेतलेले जास्त बरे. मराठी व्याकरणाच्या पुस्तकाच्या किंमती असून असून किती असणार?
मो. रा. वाळंबे लिखीत शालेय मराठी व्याकरणाचे पुस्तक वर्षानुवर्षे शालेय अभ्यासक्रमात स्टॅण्डर्ड पुस्तक म्हणून वापरले जात आहे. याला मराठीचे रेन ऍण्ड मार्टीन म्हणायला हरकत नाही. जरी याला शालेय व्याकरण म्हटले असले तरी सर्वसाधारण अभ्यासक किंवा जिज्ञासुंच्या जवळपास सर्व गरजा हे पुस्तक भागवू शकते. २००-३०० पानांचे असल्याने हाताळायला सोपे आहे, आणि सर्वसमावेशक आहे, म्हणजे व्याकराणाचे सर्व भाग हाताळलेले आहेत. आम्ही शाळेत असताना हे वापरले होते, आणि अजूनही जरूरीप्रमाणे मी यात संदर्भ पहात असतो. पुस्तकाला इंडेक्स जरी नसली तरी तपशीलवार अनुक्रमणिका आहे, ज्यातून व्याकराणातील हवा तो मुद्दा आणि त्याचा पृष्ठक्रमांक सहज शोधता येतो. तसेच शालेय उपयोगाचे असल्याने, किंमतही माफक आहे, आणि सर्वत्र उपलब्ध देखील असावे. (माझ्याजवळ असलेल्या १९७७ च्या आवृत्तीची किंमत रु. ७.५० होती असे आताच पाहीले.)