एखाद्या भाषेतील प्रत्येक शब्दाला दुसऱ्या भाषेत अगदी तोच अर्थ व्यक्त करणारा एकच प्रतिशब्द असेलच असे नाही. किंवबहुना अनेकदा नसतोच - विशेषतः जर भाषा मराठी-इंग्रजी एवढ्या दूरान्वयाच्या असल्या तर जास्तच. तसाच 'मनोगत'ला इंग्रजीत 'डिट्टो' प्रतिशब्द नाही / नसावा.  

पण अशा वेळी भाषांतरकर्त्याला तो भाव वेगळ्या वाक्प्रयोगातून (फ्रेझ) किंवा शब्दसमुहातून व्यक्त करता येऊ शकतो. उदा. मनोगत व्यक्त करणे हे 'एक्स्प्रेस थॉटस/फीलिंग्ज', ' स्पीक वन्स माइंड' या किंवा याहून समर्पक अशा इतर शब्दप्रयोगातून व्यक्त करावा लागेल, आणि त्यात काहीच चूक नाही. अशा वेळी आपल्या मनातील भाव जास्तीत जास्त योग्य प्रकारे ज्यातून व्यक्त होईल अशा शब्दप्रयोगाचा वापर करावा. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे - प्रथम दर्शनी थोडीशी वेडगळ वाटली तरी - की मनोगत हा अर्थ इंग्रजीत कसा व्यक्त करायचा हा प्रश्न 'नेटिव्ह' इंग्रजी लेखकाला कधीच पडत नाही. कारण त्याचा भाव इंग्रजीत ज्या शब्दयोजनेतून व्यक्त होईल, त्याचा वापर तो आपोआपच करतो. पण आपल्यापैकी बरेच निदान थोड्या प्रमाणात तरी, कळत-नकळत प्रथम विचार मराठीत करत असल्यामुळे असे प्रश्न उभे राहतात. भाषांतरकर्त्याचे 'टारगेट' भाषेचे (नुसत्या शब्दांचे नव्हे, तर शैलीचे, वाक्प्रयोगांचे, बोली भाषेचे, साहित्याचे इ. ) ज्ञान येथे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच इतर भाषांतून आपल्या भाषेत भाषांतर करणे हे 'तुलनेने' थोडे सोपे, किंवा कमी कठीण म्हणूया, पण दुसऱ्या भाषेत भाषांतर करणे महाकर्मकठीण. हे शिवधनुष्य उचलण्याचे सामर्थ्य फार थोड्यांमध्ये असते आणि ते धैर्य देखील थोडेच करतात.  

ता. क. - मात्र मनोगत आणि गुजगोष्ट या  शब्दांत थोड्या वेगळ्या छटा आहेत, असे मला तरी वाटते. गुजगोष्टीत थोडा गुप्ततेचा भाव अंतर्भूत आहे, तर मनोगतात त्याची गरज नाही. त्यामुळे यांचा अनुवादही वेगळा असेल.