मत द्यायलाच पाहीजे, किंवा मत देऊन तुम्ही काहीतरी पुण्यकर्म करत आहात, आणि नाही दिले तर जणू गंभीर गुन्हा आहे असा जो सुर अलिकडे आळवला जात असतो, ती नक्कीच भाकडकथा आहे. मत देणे किंवा न देणे हा संपूर्णपणे वैयक्तिक निर्णय आहे आणि माझ्या मते तो तसाच असायला हवा. शिवाय मतदानकेंद्रावर जाण्याचे / रांगेत उभे राहण्याचे कष्ट घेऊन शेवटी नोटा चा अधिकार 'बजावणे' हा तर मला सर्वात मोठा विनोद वाटतो. त्यापेक्षा मतदान न केल्यास काय फरक पडेल? 

पण जर तुमचा एखाद्या पक्षाला किंवा उमेदवाराला पाठिंबा असेल तर पाठिंबादर्शक, किंवा अगदी एखाद्या पक्ष किंवा उमेदवाराला विरोध असेल तर विरोधी मतदान शक्यतो करावे अशा मताचा मी आहे. पण अगदी काही कारणामुळे तेही नाहीच जमलं, किंवा अगदी कंटाळा आला म्हणूनही तुम्ही मतदान नाही केलं, तर तुम्ही काही भयंकर देशद्रोही कृत्य केल आहे असं मला अजिबात वाटत नाही. 

पण माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे, नाहीहेतरी माझा उमेदवार पडणारच आहे, किंवा एरवीतरी हा जिंकणारच आहे त्याला माझ्या मताची काय गरज, असा विचार नसावा. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे, हा अमुक उमेदवार /पक्षच जिंकण्याची शक्यता दिसते, तेहा त्यालाच मत द्यावे. हरणाऱ्याला मत देऊन आपलं मत 'फुकट कशाला घालवा' हा विचार जास्त घातक आहे. यासाठीच ओपिनियन पोल्सवरही माझ्या मते नियंत्रण आणणे आवश्यक आहे. तुमच्या एका मताचे महत्त्व फक्त उमेदवार जिंकण्या - हरण्यासाठी नाही, तर देशातील मतदारांचा सर्वंकष कल काय आहे याचे अचूक चित्र त्यातून मिळू शकते. 

हा मुद्दा उदाहरणातून स्पष्ट करायचा तर, आताच झालेल्या लोकसभा निवडणूकीत जी 'मोदी लाट' दिसून आली, त्यामध्ये भाजपाला एकूण ३१ % मतदान झाले. ही टक्केवारी एकूण जेवढे मतदान झाले त्यामधील आहे. ३१% म्हणजे किती कमी/जास्त असा प्रश्न पडल्यास लक्षात घेण्यासारखी महिती म्हणजे, आपल्या निवडणूकींच्या संपूर्ण इतिहासात पूर्ण बहुमत एखाद्या पक्षाला जेव्हा जेव्हा मिळाले, अशा प्रसगातील ही मतांची सर्वात कमी टक्केवारी (व्होट शेअर) आहे. या खालोखाल 'पूर्ण बहुमताचा' सर्वात कमी  व्होट शेअर १९६७ सालच्या काँग्रेसच्या  विजयात  होता. त्या वेळी काँगेसला ४०.८% मतदान झाले होते.

पुन्हा वर्तमानातील आणखी काही आकडेवारी पाहूया. यावेळी २०१४ च्या निवडणूकीत काँग्रेसचा जो 'न भुतो न भविष्यती' असा पराभव (मोदीकृपेने !!) झाला, त्यात काँग्रेसला फक्त १९.३% मते मिळाली - जी खरोखरच खूप कमी होती यात शंकाच नाही. पण तुलनेने, २००९ सालच्या निवडणूकीत भाजपाला याही पेक्षा कमी , म्हणजे १८.५% मते पडली होती. या फारशा फरक नसणाऱ्या टक्केवारीतील  सर्वात मनोरंजक गोष्ट एवढीच, की २००९ सालच्या १८.५% मतानी भाजपाला ११६ जागा मिळाल्या होत्या, तर १९.३ % मतांनी २०१४ साली काँग्रेसला फक्त ४४ जागा मिळाल्या. 

या सर्वात मुद्दा हा आहे, की निव्वळ  जिंकलेल्या जागांवरून मतदारांच्या कलाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही, कधी कधी फारच 'मिसलीडींग' - दिशाभूल करणारे चित्र उभे रहाते. पण प्रत्येकाने जर स्वतःच्या प्रामाणिक मतानुसार जर मतदान केले, तर निवडणूकीच्या निकालात फरक पडेल न पडेल, पण मतदारांच्या एकूण कलाचे एक स्पष्ट चित्र उभे रहायला नक्कीच मदत होईल. त्यामुळे वर उल्लेख केलेल्या शंका कुशंका न काढता 'प्रामाणिक' मतदान केल्यास काहीतरी उपयोग नकीच आहे. निदान तुमच्या पक्षाची /उमेदवाराची टक्केवारी तुम्ही नक्कीच वाढवू शकता, निदान विरोधी पक्ष/उमेदवाराची कमी करू शकता (टक्केवारी) !!