आणखी एका दृष्टिकोनातून पाहिलं तर भाषेच्या भारतीयत्वाचा निकष ती भाषा भारतात किती काळ वापरली जात आहे, यावरूनही ठरवता येऊ शकेल. ज्या भाषा भारतातच उत्पन्न झाल्या, किंवा आठवत नसलेल्या / माहीत नसलेल्या काळापासून भारतात वापरात आहेत, त्या नक्कीच भारतीय भाषा होतात. म्हणजे सगळ्या इंडो-आर्यन - संस्कृतोत्पत्त, आणि भारतीय द्राविडी भाषा, आणि उत्तर पूर्वेच्या काही इतर गटातील भाषा. पण अशी भाषा जी काहीशे वर्षांपूर्वीच भारतात आली हे आपल्या स्मरणात आहे, ती भाषा आपल्याला 'भारतीय' वाटत नाही. इंग्लिशच कशाला, त्याच्याही कित्येक काळ आधी फारसी भाषा देखील भारतात आली होती, आणी अजूनही तिचे अस्तित्व थोड्या प्रमाणात का होईना, आहे. पण ती भारतीय भाषा आहे का असा प्रश्न देखील आज आपल्याला पडत नाही.