माझ्या मते 'काँगेसमुक्त भारत' ही फक्त मोदींची एक धूर्त मार्केटिंग स्लोगन आहे. मोदींनी आणि भाजपाने लोकांमधल्या नाराजीचा उपयोग करून घेतला, त्याला खतपाणी घातलं आणि त्यांना स्वप्न दाखवली. हे काम त्यांनी अत्यंत कौशल्याने केले यात शंका नाही.
जरी वादासाठी मान्य केलं की की काँग्रेसमुक्त भारत हे काहीतरी चांगलं आहे, तरी अशी परिस्थिती काही यापूर्वी कधी आलीच नव्हती असे तर नाही. १९७७-१९८०, १९८९-१९९१, १९९६-१९९९ आणि १९९९ ते २००४ या प्रदीर्घ काळात भारत 'काँग्रेसमुक्त' च होता. यापैकी सर्वात प्रदीर्घ टर्म शेवटची - १९९९ ते २००४, ज्या काळात अर्थातच भाजप प्रणित सरकार होते, आणि त्याचे नेतृत्व - वाजपेयींचे - अर्थातच आजच्या नेतृत्वापेक्षा खूपच जास्त सर्वसमावेशक होते, हे तर भाजपवालेही मान्य करतील. पण त्या सरकारनेही काही फार नेत्रदीपक कामगिरी केली होती असं नाही. भ्रष्टाचारा बाबतीत तर भाजपाचे जणू काँग्रेसीकरण झाले असेच सर्व म्हणू लागले.
काँग्रेसी पापाचा घडा, जरी त्यावरी मारिला खडा,
त्याच पापामध्ये भिजोनी, चिंब कमळा झाली ।
असे खुद्द 'तंबी दुराई' ने म्हणून ठेवले आहे. पण 'पब्लिक मेमरी इज शॉर्ट' हेच खरे. कारण हे सर्व विसरून भाजपाने आता काँग्रेसी भ्रष्टाचाराविरुद्ध रान उठवले, आणि त्यात ते पूर्णपणे यशस्वी झाले.
तेव्हा 'काँग्रेसमुक्त भारत' ही एक फसवी घोषणा आहे. भाजपा-मोदी-संघाने सखोल प्लॅनिंग करून ३ वर्षे पद्धतशीरपणे आणि कौशल्याने स्ट्रॅटेजी राबवली याचे श्रेय मात्र त्यांना द्यावेच लागेल.