"म्हणूनच असे म्हणावेसे वाटते की, धूर्तपणाचा उपयोग करता येणे म्हणजेच अंमलबजावणीतील सुसूत्रात किंवा गुड गवर्नन्स च्या आधारे यश मिळवणे होय. हे सर्व त्यांनी कौशल्याने केले आहे असे तुम्ही म्हणत आहात. त्यामुळे याबाबतीत आपली दोघांची मते सारखीच आहेत असे म्हणावेसे वाटते. " - भागवत
माफ करा, पण आपली मते सारखी आहेत असे मला अजिबात वाटत नाही. तुम्ही धूर्त या शब्दावर शब्दच्छल करून मुद्दा सिद्ध करायचा प्रयत्न केला आहे. धूर्त या शब्दाचा अर्थ चांगला वाईट काहीही काढा. तुम्हीच म्हटल्याप्रमाणे हे चांगलं-वाईट व्यक्ती सापेक्ष आहे. माझा मुद्दा एवढाच आणि अगदी स्पष्टपणे असा होता की ज्या (भ्रष्टाचाराच्या) मुद्द्यावर भाजपाने प्रचार करून निवडणूक जिंकली, त्याबाबतीत ते स्वतः काही फार स्वच्छ होते अशातला भाग नाही. किंवबहूना, काँग्रेसपेक्षा ते कांकणभर सरसच ठरले असावेत. पुन्हा एकदा 'तंबी दुराई' उद्धृत करतो (ही कवने २००५ सालच्या मे महिन्यात लिहिली गेली होती) -
" भाजपाचे हे थोरपण जिथे पहुचण्या काँग्रेसजन
घेतली शंभर वर्षे हे पहुचले झडकरी ॥ "
तेव्हा करून सवरून आता पुन्हा भ्रष्टाचार निर्मुलनासाठी 'काँग्रेसमुक्त भारताची' घोषणा द्यायची, याला भोंदूपणा नाही तर आणखी काय म्हणंणार ?
"जर धूर्तपणा पक्षासाठी वापरला जात असेल, म्हणजे पक्ष वाढावा, पक्षाची पाळेमुळे खोलवर रुजावीत, देशासाठी काहीतरी करून दाखवता यावे यासाठी पक्षाला सत्ता मिळावी वगैरेसाठी केला गेल्यास तो वाजवी म्हणावा लागेल. "
हा तर फारच मोठ्ठा वादाचा मुद्दा आहे. या मुद्द्यावर सर्वच पक्षातील बहुतेक उमेदवार 'सुटू शकतील'!! कारण सगळेच बडे राजकीय नेते पक्षाच्या भल्यासाठीच कार्य-रत असतात !! अगदी जरी मान्य केलं की एखादा नेता अगदी प्रामाणिकपणे पक्षाच्या भल्यासाठी कार्य करत आहे, तरी पक्षाचं भलं आणि देशाचं भलं ही नेहेमी एकच गोष्ट आहे असं तर अजिबातच नाही. तेव्हा ज्या व्यक्तीला असं वाटतं की पक्षाच्या भल्या 'वगैरेसाठी' केलेले सर्व कार्य 'वाजवी' आहे, तर त्या व्यक्तीची निष्ठा देशापेक्षा पक्षाशी जास्त आहे असच म्हणावं लागेल. या मुद्द्यावर आणखी खूपच स्पष्ट बोलण्यासारखं आहे, पण ते स्पष्टपणे बोलणं कदाचित आज वाजवी होणार नाही.
"ज्याला काही करून दाखवायचे असते त्याला स्वप्ने पाहावी लागतात. इतरांना ती दाखवावी लागतात. "
येथे स्वप्ने पहाणे आणि स्वप्ने दाखवणे यातला फरक लक्षात घ्यायचा आहे. हिंदी चित्रपट प्रेक्षकांना स्वप्न दाखवतात. ही स्वप्न कितपत प्रत्यक्षात उतरणारी असतात याविषयी काही भाष्य करण्याची गरजच नाही. आणि हिंदी चित्रपटांच्या लोकप्रियतेचे रहस्य बऱ्याच प्रमाणात या स्वप्नरंजनातच दडलेले आहे हेही काही गुपित नाही. स्वप्न दाखवून लोकांना भुलवता येऊ शकतं, आणि हेच मोदींच्या मार्केटिंगचे सूत्र आहे !!
"सखोल प्लॅनिंग,३ वर्षे पद्धतशीर प्रयत्न आणि कौशल्य या शब्दांचा तुम्ही उल्लेख करत आहात म्हणजे जणू गुड गव्हर्नन्स या शब्दाची व्याख्याच सांगत आहात. त्यामुळे तुम्ही मोदींवर टीका करत आहात की भलावण तेच समजत नाही आहे."
ब्रिटिश सरकारने देखील कौशल्याने (भारतातील) राज्य चालवले होते. आता ही इंग्रज सरकारवर टीका आहे की भलामण ? याहून जास्त काही स्पष्टीकरणाची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. अनेकदा एखादा माणूस जेव्हा लबाडी करतो, तेव्हा कधी कधी त्याच्या लबाडी करण्यातल्या कौशल्याचं देखील कौतूक होतं. पण त्याचा अर्थ आपण त्या लबाडीच कौतूक किंवा समर्थन करतो असा अर्थातच नसतो. शिवाय त्यातील उपरोधाचा भागही लक्षात घ्यायला हवा. पण कधी कधी उपरोध न समजून हे 'कौतूक' शद्बार्थाने घेतलं जातं !!
तेव्हा, शेवटी मला असं वाटतं की आपलं फक्त एकाच मुद्द्यावर एकमत झालं आहे, आणि तो म्हणजे तुमचं उत्तर हे मूळ लेखापेक्षा मोठं झालेलं आहे.