आज भाजपला संजीवनी मोदींमुळे मिळाली आहे. भाजपमधील मरगळ केवळ मोदींमुळे दूर होत चालली आहे. मोदी नसते तर महाराष्ट्रात युती तोडायची हिंमत कोणताही भाजपा नेता दाखवू शकला नसता. आपण स्वबळावर काही करू शकतो असा आत्मविश्वास भाजपा कार्यकर्त्यात निर्माण करण्यात मोदी यशस्वी ठरत आहेत व उत्तरोत्तर त्यात वाढच होत आहे. अगदी याच पद्धतीने ते जातीपाती, धर्म व प्रांतवाद यात विभागलेला भारतीय माणसात एकसंघता निर्माण करू पाहत आहेत. इतकेच नव्हे तर भारताबाहेर असलेल्या भारतीयांमध्येही हा बदल घडताना दिसत आहे. मोदींचा वाढत असलेला जनाधार ही त्याचीच लक्षणे आहेत. महाराष्ट्रातही १४ टक्के जनाधार असलेल्या भाजपने आज २७. ९ टक्के जनाधार प्राप्त केलेला आहे. आणि मुख्य म्हणजे हा जनाधार प्राप्त करण्यासाठी जातीपातींमधील द्वेषाचा आधार घेतलेला नाही. तर विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
यासाठीच मोदी समर्थक व मोदी विरोधक यांना पूर्वग्रह बाजूला ठेवून मोदी नीट समजावून घेण्याची वेळ आलेली आहे असे वाटते. माझे तीनही लेख मोदी नीट समजावून घेण्यासाठी लिहिलेले आहेत. मोदी समर्थकांनी मोदी नीट समजावून घेतले नाहीत तर त्यांना मोदींबरोबर नीट काम करता न आल्याने ते भाजपमध्ये एकटे पडतील. याउलट मोदी विरोधकांनी मोदी नीट समजावून न घेता ते त्यांच्याविरूद्ध लढत राहिले तर एकीकडे मोदींना विरोध करण्याचे प्रचंड श्रम घेतल्याचे समाधान तर दुसरीकडे मोदींचा वाढत चाललेल्या जनाधाराच्या आधारावर मोदींचा उत्कर्ष पाहण्याची वेळ येईल.
त्यामुळे मी जे मुद्दे मांडतोय त्यात मोदी आहेत तर तुम्ही जे मुद्दे मांडताय त्यात मोदी वगळण्याचा प्रयत्न करत आहात. उदा. तंबीदुराई चा उल्लेख तुम्ही परत परत करताय. पण तंबी दुराई मोदींबद्दल बोलत आहेत का? आणि ते ज्या भाजपाबद्दल बोलत आहेत त्या वेळेचे नेते एक तर निवृत्त झालेले आहेत किंवा बाजूला फेकले गेलेले आहेत. मी मोदींच्या स्वप्ने दाखवून आपण काहीतरी नक्की करू शकू असा आत्मविश्वास जनतेत निर्माण करण्याबद्दल बोलतोय तर तुम्ही सिनेमातील स्वप्ने दाखविण्याबद्दल बोलताय. मी मोदींच्या धूर्तपणाबद्दल बोलतोय तर तुम्ही मोदीसोडून इतरांच्या धूर्तपणाबद्दल बोलताय.
त्यामुळे प्रामाणिकपणाच्या आधारावर मी जशी मते मांडतोय तशीच तुम्हीपण तुमची मते प्रामाणिकपणे मांडत आहात हे जाणवत असूनही विचार करण्याच्या दृष्टिकोनातच खूप फरक असल्याने तुम्हाला शुभेच्छा देऊन २०१९ सालापर्यंत थांबायचे ठरवतोय.