"कांग्रेस मुक्त"चे जे अनेक अर्थ आहेत.  काही महत्वाचे अर्थ
१: सुबत्तेचे पुनर्वसन.
२: मत त्यांनाच जे जबाबदारी अंगावर घेऊन सत्ता गाजवतील. यशाचे श्रेय घेतील तर अपयशाचे खापर पण झेलतील. "आतला आवाज" सांगून जबाबदारी टाळतील पण मागच्या दाराने "राष्ट्रीय सल्लागार परिषद" या नांवाखाली सत्ता गाजवतील, ते जनतेला नको आहेत.
३: जात, धर्म, प्रांत इत्यादी अस्मितांचे राजकारण संपले. आता जनतेला कृती करणारा राज्यकर्ता हवा आहे.
४: राज्यकर्त्यांनी "टाकलेले तुकडे" (मनरेगा, अन्न सुरक्षा इत्यादी) उचलणे आता जनेला मान्य नाही. एक तातडीचा तात्पुरता उपाय म्हणून हे ठीक आहे. पण मनरेगा हे काही करीयर होऊ शकत नाही. मिंधेपणा पुरे झाला. ज्यांची धोरण कुवत असे "तुकडे टाकण्या" इतपतच आहे, त्यांनी घरी बसावे.

एकूणच हिंदू संस्कृतीत व खास करून महाराष्ट्रात गरीबीचे अती उदात्तीकरण आहे. "धट्टी कट्टी गरीबी, लुळी पांगळी श्रीमंती" असले तद्दन मूर्ख व दांभिक सु(?)भाषित जगातील दुसर्या कुठल्याही भाषेत वा संस्कृतीत असेल असे वाटत नाही. इंडिया एक्स्प्रेस चे शेखर गुप्ता यांनी एक नवीन शब्द वापरात आणला - पॉवरटेरियन. म्हणजे पॉवर्टी (दारिद्र्य) नांदवणारा/ जोपासणारा. भारता सारख्या संसाधनांच्या तुलनेत खूपच जास्त जनसंख्या असलेल्या देशात दारिद्र्य संपविणे सोपे नाही. पण किमान तसा प्रयत्न तरी करायला हवा, आणी त्या करता आधी हे मान्य करावयास हवे कि दारिद्र्यात काहीही उदात्त नाही व सुबत्तेत काहीही गुन्हा नाही.

सुबत्ता म्हणजे तुमच्या कडे टोयोटा इनोवा किंवा ४८ इंची एलईडी टीवी असणे, येवढेच नव्हे. किंबहुना ते कमी महत्वाचे. तुमच्या घरात काम करणारी मोलकरीण तुमच्या घरातले कालचे शिळे अन्न आता स्वीकारत नाही, कारण आता तिच्या कडे अन्न धान्य विकत घेण्याची ऐपत आहे. ही पण सुबत्ताच आहे व फार महत्वाची आहे. तुमच्या घरातील उरलेला भात चांगल्या बासमती तांदूळाचा होता, पण तो स्वीकारण्यात मिंधेपणा होता. मोलकरीण विकत घेते तो तांदूळ जाडा भरडा असेल, पण तो तिने स्वत:च्या कष्टाने मिळवलेल्या पैश्यातून घेतलेला आहे, व म्हणून त्यात आत्म सम्मान आहे व ते फार फार महत्वाचे आहे. आमच्या सोसायटीत सुरक्षा गार्डचे काम करणार्या प्रत्येका कडे मोबाईल फोन आहे व माझा कार-चालक कामा वर येतो-जातो तो स्वत:च्या मोटरबाईक वरून.  सुबत्ता व त्यातून येणारा आत्म सम्मान, काही भौतिक सुख वगैरे म्हणजे काय ते गरीब जनते पैकी अनेकांना १९९२ नंतर पहिल्यांदाच कळले. 

पण नरसिम्हा राव-मनमोहन सिंग यांनी सुरु केलेले व अटल बिहारी बाजपेयी यांनी पुढे चालू ठेवलेले सर्व आर्थिक सुधार २००४ नंतर, कोणतीही जबाबदारी न घेता सत्ता गाजवू पाहणार्या माय-लेकांनी उलटविले. "राष्ट्रीय सल्लागार परिषद" या नांवाखाली कोणतेही संवैधानिक पाठबळ नसलेली व कोणतीही जबाबदारी नसलेली एक संस्था बनवून तीत अनेक कडव्या डाव्या विचारसरणीच्या उडाणटप्पूंची भरती केली; या मंडळींनी दहा वर्षे गरीबीचे उदात्तीकरण केले;  व १९९२ साली आर्थिक सुधारणांचे शिल्पकार मनमोहन सिंग यांनी या पॉवरटेरियन मंडळींच्या प्रत्येक प्रस्तावा वर मुकाट्याने शिक्कामोर्तब केले.

या लोकांनी विकास (डेवलोपमेण्ट) या शब्दाला चार अक्षरी शब्द (फोर लेटर वर्ड) करून टाकले. सरकार ओडीशात पोस्को प्रकल्प सुरु करण्या साठी जिवाचे रान करीत आहे; पंतप्रधान  कोरियात गेलेले असताना प्रकल्प शक्य तितक्या लवकर सुरु करण्याचे आश्वासन देत आहेत; व इकडे त्यांचे युवराज ओडीशात जाउन "मी दिल्लीत तुमचा शिपाई आहे" असे सांगून प्रकल्प बंद पाडीत आहेत. का म्हणून लोकांनी यांना मत द्यावे? या उलट तिकडे गुजरातेत व मध्य प्रदेशात आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा असलेल्यां प्रकल्प विरोधकांना तोंड देत भाजपा शासनाने इंदिरा सागर,  ओंकारेश्वर, महेशवर, इत्यादी प्रकल्प पूर्ण केले, सरदार सरोवर पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. व असे इतर अनेक.

गरीब जनतेला पण आता सुबत्ता म्हणजे काय हे कळले आहे व आता सर्वांनाच सुबत्ता हवी आहे.  व त्यात काहीही गैर नाही. "धट्टी कट्टी गरीबी, लुळी पांगळी श्रीमंती" हे आता, वर्तमान पत्रात लेख लिहिणारे सर्वज्ञानी महाभाग सोडून, कोणीच स्वीकारीत नाही. १९९२ साली सुरू केलेल्या आर्थिक सुधारणा जर यूपीए सरकारने पुढे नेल्या असत्या तर भाजपा चा उदय होण्याचे एक महत्वाचे कारण बाद झाले असते.

२०१४ सालच्या निवडणूकात लोकांनी एक महत्वाचा संदेश दिला आहे. हरयाणा या जाट प्रदेशात वीस वर्षं नंतर पहिल्यांदाच एक अ-जाट मुख्य मंत्री होणार आहे. व अ-मराठींना महाराष्ट्रात पाऊल पण न ठेवू देण्याची भाषा करणार्यांना मतदारांनी फक्त एक जागा दिली आहे. यात संदेश आहे तो असा कि आता मतदारांना जात, प्रांत वगैरे अस्मिता दुय्यम झाल्या आहेत. तरुण वर्गाची भविष्या बाबत काही स्वप्ने आहेत. व ती स्वप्ने पूर्ण करणारा जाट  आहे का नॉन-जाट, इत्यादी भावनिक मुद्द्यांशी त्यांना फारसे देणेघेणे नाही. अगदीच अशिक्षीत भोळे-भाबडे सोडले तर त्यांची ही स्वप्ने भाजपा पाच वर्षात पूर्ण करेल अशी कोणाचीच अपेक्षा नाही. पण तसे करण्याचा प्रयत्न मात्र भाजपा करेल असा विश्वास आहे. उलटपक्षी कांग्रेसला सत्ता दिल्यास खरी सत्ता माय-लेकच गाजवणार, पण कोणतीही जबाबदारी न घेता, व डाव्या विचारसरणीच्या बेजबाबदार एनजीओंच्या संगतीत जनते समोर मनरेगा, अन्न सुरक्षा, असल्या "तुकडे फेकण्याच्या" पलीकडे काहीही करणार नाही. म्हणून जनतेने त्यांना नाकारले.