इंग्रजी ही निश्चितपणे भारतीय भाषा झाली आहे. असे म्हणतात की, अमेरिकेसारखा फार मोठा देश सोडला, तर इंग्रजी समजणारे सर्वाधिक लोक अन्य कोणत्याही देशात नसून भारतात आहेत. भारतात प्रांतांप्रातांतून प्रवास करीत असताना गावोगावच्या स्थानिक भाषांचे ज्ञान असणे आवश्यक असले तरी अशक्य आहे. पण एक इंग्रजी येत असली की कोठेही अडत नाही. लहानशा खेड्यातही इंग्रजी समजणारा एक तरी माणूस सापडतो. लोकांना इंग्रजी बोलता येत नसले तरी इंग्रजी शब्द माहीत असतात, त्या जोरावर आपल्याला व्यक्त होता येते.
एके काळी संस्कृत ही अशीच संपर्काची भाषा होती. तसे नसते तर आदी शंकराचार्य केरळपासून ते काश्मीरपर्यंत आणि द्वारकेपासून ते जगन्नाथपुरीपर्यंत वेदान्तविद्येचा प्रसार करीत फिरूच शकले नसते. आज इंग्रजी येत असलेला माणूस असाचा भारतभर विनाअडचण फिरू शकतो.
घरांत इंग्रजीतून संवाद होत नाहीत? आंतरप्रांतीय मुलांमुलींची लग्ने झाली की घरांत इंग्रजीशिवाय दुसरी भाषा चालतच नाही. आणि अशी लग्ने आता सररास होतात. माझ्या ओळखीच्या एका सारस्वत कुटुंबातील पत्नीचे शिक्षण मराठीतून तर पतीचे कानडीतून झाले होते. दोघांची मातृबोली कोंकणी, त्यामुळे घरात संवाद कोंकणीतून चाले, पण पत्रव्यवहारासाठी इंग्रजीशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
सिमेंट-वाळूचे मिश्रण कराणाऱ्या मजुराला त्याची डोक्यावरून घमेली वाहून देणारी सहचरी सांगत होती, "तुम्ही अजाबात टेन्शन घेऊ नका, मी आहे! " असे ऐकल्यावर इंग्रजी ही भारतीय भाषा झाली नाही, हे कुणाला पटावे?